पेणधरच केले पेंधर, तर धानसरल बस स्टॉपवर गावाचं नावच गायब
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेतील प्रभाग एकमधील पेणधर गावाचे प्रवेशद्वार असलेल्या कमानीवर पालिकेतर्फे लावण्यात आलेल्या फलकावर पेणधर ऐवजी पेंधर अशा उल्लेखाचा फलक पालिकेकडून लावण्यात आला आहे. तर, याच प्रभागातील धानसर गाव येथे बांधण्यात आलेल्या बस स्टॉपवर गावाच्या नावाचाच उल्लेख नसल्याने पालिकेला गावांच्या नावाचं वावडं आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील 23 ग्रामपंचायत आणि 29 गावांचा समावेश पनवेल पालिकेत करण्यात आला आहे. या ठिकाणी सेवा सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून गावाबाहेर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीवर पालिकेत समाविष्ट गाव म्हणून गावाचे नाव टाकण्याच काम पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील पेणधर गावाच्या कमानीवरदेखील पालिकेच्या माध्यमातून गावाचे नाव टाकण्यात आले आहे. मात्र, हे नाव टाकताना पेणधर असे नाव न लिहिता पेंधर असे नाव लिहून नावाचा अपभ्रंश करण्यात आल्याने पालिकेच्या मराठी भाषेच्या अज्ञानाविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बस थांब्यावर गावाचे नावच नाही
पालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 मधील धानसर गाव येथे बस थांबा बांधण्यात आला आहे.या थांब्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. थांब्यावर गावाच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नसून, विद्युत वाहिनीची जोडणी नसताना अर्धवट काम झालेल्या या थांब्याचे उद्घाटन आ. प्रशांत ठाकूर यांच्या करण्यात आले आहे.









