| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्यावतीने 19 वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उरण क्रिकेट स्पोर्ट्स असो. संघाने दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर संघावर शानदार विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आता उरण संघाचा अंतिम सामना भेंडखळ क्रिकेट अकॅडमीबरोबर होणार आहे. हे दोन्ही संघ उरण तालुक्यातील असल्याने येथील युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावर निर्माण झाले आहे.
या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यूसीएसए संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करतांना चॅम्पियन्स खारघर संघाने 37.2 षटकात सर्व गडी गमावत 198 धावा केल्या. त्यामध्ये नितेश निषाद (50) याने सर्वाधिक धावा काढल्या. तर, ओम भोईर 41 व सनत कोळी याने 33 धावा काढून संघाला योगदान दिले. उरण संघाकडून अमेय पाटील याने सर्वाधिक 5 फलंदाजाना तंबूत धाडले. तर, ओम म्हात्रे 3 व अर्चित म्हात्रेने 2 गडी बाद केले. प्रतिउत्तर देताना उरण संघाने 35.2 षटकात 4 गडी गमावत 199 धावांचे लक्ष सहज गत्या पूर्ण केले. उरण संघाचा सलामीवीर स्मित पाटील याने (नाबाद 102) आपले शतक पूर्ण केले. त्याला मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू ओम म्हात्रे याने (नाबाद 55) भक्कम साथ दिली. चॅम्पियन्स खारघर कडून ओम भोईर याने 3 फलंदाज बाद केले.







