। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे, सेक्टर-35 मधील प्रतीक जेम सोसायटीत राहणाऱ्या मस्कर कुटुंबांच्या घरातून सप्टेंबर महिन्यात 22 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी तक्रारदार यांच्या शेजारी राहणाऱ्या मोनिका शंतनू दिघे (40) या महिलेला अटक करून तिच्याकडून चोरीचे 22 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. मोनिका दिघे हिला सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मस्कर कुटुंबीयांनी 27 सप्टेंबर रोजी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. मात्र, गुन्हा दाखल होऊन ही पोलीस आरोपीपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप मस्कर कुटुंबीयांकडून करण्यात येत होता. या प्रकरणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तशी भूमिका मांडली होती. मस्कर कुटुंबीयांनी मोनिका दिघे यांच्यावर थेट आरोप केले होते आणि त्यांनीच दागिने चोरल्याचे पोलिसांना देखील सांगितले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर व.पो.नि. विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित मोनिका दिघे यांचा पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर कामोठे पोलिसांनी मोनिका दिघे हिला दोन महिन्यानंतर ताब्यात घेतले आणि तिची कसून चौकशी करत तिने चोरलेले 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.







