पहिला एकदिवसीय सामना; विराट कोहलीचे शतक
| रांची | वृत्तसंस्था |
रांचीतील पहिल्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 17 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विराट कोहली, कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांचे विजयात महत्त्वाचे योगदान राहिले. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 350 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 49.2 षटकात सर्वबाद 332 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सिन, मॅथ्यू ब्रिट्झके आणि कॉर्बिन बॉश यांनी झुंज दिली.
दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिकल्टन आणि एडेन मार्करम यांनी डावाची सुरुवात केली होती. पण हर्षित राणाने दुसऱ्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला दोन मोठे धक्के दिले. त्याने पहिल्या चेंडूवर रिकल्टनला शून्यावर मागे धाडले. त्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर अनुभवी क्विंटन डी कॉकलाही त्याने शून्यावर बाद केले. त्यानंतर मार्करमही फार काळ टिकू शकला नाही. त्याला अर्शदीप सिंगने यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातून 7 धावांवर झेलबाद केले. त्यामुळे 11 धावांवर 3 विकेट्स अशी बिकट अवस्था दक्षिण आफ्रिकेची झाली होती. मात्र, नंतर मॅथ्यू ब्रिट्झके आणि टोनी डी झोर्झी यांनी डाव सावरताना 66 धावांची भागीदारी केली. त्यांची भागीदारी रंगत असताना झोर्झीला 15 व्या षटकात कुलदीप यादवने 39 धावांवर बाद केले.
डेवाल्ड ब्रेव्हिसने आक्रमक खेळत ब्रिट्झकेची साथ दिली. त्यांच्यातही 53 धावांची भागीदारी झाल्याने दक्षिण आफ्रिकेच्या डावाला स्थिरता मिळाली होती. ब्रव्हिसला 22 व्या षटकात हर्षित राणाने बाद केले. त्याचा 28 चेंडूत 37 धावांवर ऋतुराज गायकवाडने चांगला झेल घेतला. तो बाद झाल्यावर यान्सिनने आक्रमक फलंदाजी केली. दुसरी बाजू ब्रिट्झके सावरत असताना यान्सिनने मोठे फटके खेळले. या दोघांनी 6 व्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली, ज्यात यान्सिनच्या 70 धावांचे योगदान होते. या भागीदारीदरम्यान ब्रिट्झकेचेही अर्धशतक झाले. अखेर कुलदीप यादवनेच ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने रवींद्र जडेजाच्या हातून यान्सिनला 34 व्या षटकात बाद केले. यान्सिनने 39 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटाकारांसह 70 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर याच षटकात ब्रिट्झकेलाही कुलदीपने विराट कोहलीच्य हातून झेलबाद केले. ब्रिट्झकेने 80 चेंडूत 72 धावांची खेळी केली. तरी नंतर कॉर्बिन बॉश आणि प्रेनेलन सुब्रयेन यांनी डाव पुढे नेला. मात्र सुब्रयनलाही 17 धावांवर कुलगीपने 40 व्या षटकात बाद केले.
पण तरी नांद्र बर्गरने कॉर्बिन बॉशची साथ देत संघाला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्शदीपने नांद्रे बर्गरला 17 धावांवर बाद केले. तरी बॉश दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्याने अर्धशतकही पूर्ण केले होते. पण अखेरच्या षटकात 18 धावांची गरत असाताना दुसऱ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने कॉर्बिन बॉशलाच रोहित शर्माच्या हातून झेलबाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव संपवला. बॉश 51 चेंडूत 67 धावांवर बाद झाला.भारताकडून कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या. तसेच हर्षित राणाने 3 विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 349 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 135 धावांची खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागीदारी केली. रोहितनेही 51 चेंडूत 57 धावांची खेळी केली. केएल राहुलनेही 60 धावांची खेळी केली, तर रवींद्र जडेजानेही 32 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली.







