| मुंबई | प्रतिनिधी |
राजधानी दिल्लीत प्रदूषणाची मोठी समस्या आहे. अनेकांना मास्क लाऊन घराबाहेर पडावे लागत आहे. अशातच आता मुंबईतील हवेची गुणवत्ता देखील खालावत चालली आहे. मुंबईतील काही भागात प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे एक्यूआयदेखील वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने जीआरएपी-4 च्या पातळीवरील निर्बंध लागू केले आहेत.
मुंबईतील काही भागात हवेची गुणवत्ता ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत पोहोचली आहे. या भागांमध्ये मडगाव, देवनार, मालाड, बोरीवली ईस्ट, चकाळा-अंधेरी ईस्ट, नेव्ही नगर, पवई आणि मुलुंड या भागांचा समावेश आहे. या भागात बीएमसीने विविध बांधकाम कामांवर आणि धूळ निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टींवर तात्पुरती बंदी घातली आहे. तसेच, साइट्सची तपासणी करत 50 साईटना नोटिस बजावण्यात आली आहे. या साइट्सवरील काम थांबवण्याचे किंवा पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय लघुउद्योग, बेकऱ्या आणि मार्बल कटिंग युनिट्सना धूळ कमी उडेल याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुंबई मनपाद्वारे देण्यात आला आहे. धूळ नियंत्रण आणि प्रदूषणावर सतत लक्ष ठेवण्यासाठी बीएमसीने प्रत्येक वॉर्डमध्ये फ्लाइंग स्क्वाडची देखील नियुक्ती केली आहे.







