। महाड । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेसाठी आज मतदान पार पडत आहे. यावेळी आ. भरत गोगावले आणि खा. सुनील तटकरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुशांत जाबरे व शिवसेना शिंदे गटाचे विकास गोगावले यांच्या समर्थकांमध्ये किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाली. यामध्ये सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी जबर मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. तसेच विकास गोगावले यांच्या समर्थकांनी सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यामुळे सध्या महाडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी महाड पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेनंतर महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.







