चार ठिकाणी किरकोळ बाचाबाची
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद निवडणुकीत सकाळपासून मतदान केंद्राच्या बाहेर तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. चार ते पाच प्रभागांत मतदान केंद्राच्या बाहेर बाचाबाची होण्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी मतदानाला सुरुवात झाली असता शांततेत मतदान सुरू होते. मात्र, मतदान यंत्र बंद पडत असल्याने मतदारांमध्ये नाराजी होती. त्याचा परिणाम शहरातील विविध मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. त्यात दुपारी प्रभाग दोनमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात असलेल्या मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ घातला जात होता. त्यावेळी महिला उमेदवारांनी कडक भूमिका घेतल्याने गर्दी करून राहिलेली मंडळी निघून गेल्याचे बोलले जात आहे. प्रभाग एकमधील मतदान केंद्र असलेल्या शासकीय विश्रामगृह येथील मतदान केंद्राच्या बाहेर चार वाजण्याच्या सुमारास दोन्ही आघाड्यांकडून बाचाबाचीपर्यंत प्रकार गेले. मात्र, प्रभाग चारमधील जीवन शिक्षण मंडळाच्या मतदान केंद्राच्या 100 मीटर परिघात कार्यकर्ते गेल्याने तेथे निवडणूक लढवत असलेल्या दोन उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. महायुती आणि कर्जत परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते यांच्यात एकमेकांवर घेऊन धावून जाण्यापर्यंत प्रकार घडले. दरम्यान, असे प्रकार कर्जत शहरात घडल्याने कदाचित मतदानानंतर निर्माण झालेला तणाव वाढण्याची शक्यता आहे. कर्जत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्जत पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.







