| कोर्लई | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा रुग्णालय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल घुगे, मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना गट शिघ्रे आणि मेहबूब इंग्लिश स्कूल विहूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम विषयी माहिती देण्यात आली आणि तंबाखूमुक्ती शपथ घेण्यात आली.
ग्रामीण रुग्णालयातील दंत शल्यचिकित्सक डॉ. शेखर वानखेडे, अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. फीरोज शेख, विहूर येथील मेहबूब इंग्लिश स्कूल अधिव्याख्याता मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सन.2023 पासून देशातील तरुणांसाठी तंबाखूचा वापर रोखण्यासाठी व सोडविण्यासाठी तंबाखूमुक्त युवा मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग तंबाखूमुक्त युवा अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालयातील दंत शल्यचिकित्सक डॉ. शेखर वानखेडे यांनी अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आणि तोंडाचा कर्करोग (कॅन्सर) याबाबत सविस्तर माहिती देऊन तंबाखूमुक्त शपथ दिली.







