| पनवेल | प्रतिनिधी |
कळंबोलीतील केंद्रीय भंडारम निगम बोर्डाच्या समोरील रस्त्यावर रत्नेशकुमार राजकुमार जैस्वाल या व्यक्तीला हाताबुक्यांनी व लाकडी दांडक्याने डोक्यात व इतर ठिकाणी मारहाण करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले होते. त्याला उपचारासाठी कामेठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, रत्नेशकुमार याचा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या 24 तासांत अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तपास करण्यासाठी 2 वेगवेगळी पथके तयार केली होती. त्यानुसार केलेल्या तपासात हा गुन्हा दोन अनोळखी व्यक्तींनी केल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने तपास केला असता हा गुन्हा स्कुटी वरून आलेल्या दोन व्यक्तींनी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्या स्कुटीची माहिती घेऊन पुढील तपास करण्यात आला. त्यानंतर मोहम्मद चाँद शाबीर शेख (25) व जुएफ जमिल ईलियास शेख (25) या दोघांना विश्वासात घेऊन अधिक तपास करण्यात आला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबोली स्टिल मार्केट सर्व्हिस रोड येथे उभे असलेल्या तृतीयपंथी यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू झाला. हा वाद मिटविण्यासाठी रत्नेशकुमार जैसवार व त्याचे मित्र आले होते. त्याचा राग मनात धरून मोहम्मद चाँद व जुएफ यांनी रत्नेशकुमार जैसवार याच्याशी वाद घातला. त्यांनी हाताला मिळेल त्याने रत्नेशकुमार वर हल्ला करत गंभीर जखमी केले आणि तेथून पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेल करीत आहेत.







