नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू
| चिरनेर | प्रतिनिधी |
करंजा-रेवस सागरी मार्गावरील 34 कोटी खर्चाच्या रो-रो जेट्टीचे काम कंत्राटदार अर्ध्यावरच सोडून गेल्याने मागील काही महिन्यांपासून हे काम रखडले आहे. तसेच, हे काम पूर्ण करण्यासाठी खर्चात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुंबई सागरी महामंडळाचे कार्यकारी अभियंता मनिष मेतकर यांनी दिली आहे.
रेवस-करंजा रो-रो प्रकल्पाचे काम सागरमाला योजनेतून सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या कामावर मोठ्या प्रमाणावर खर्चही करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही या सागरी मार्गावरील काम अपूर्ण अवस्थेत असल्याने रो-रो सेवा सुरू झालेली नाही. करंजा बंदरातील रो-रो जेटीचे काम पूर्ण झाले असून रेवस येथील रो-रो जेट्टीचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. येथे काही प्रमाणात बांधकाम, ब्रेकवॉटर जेट्टी, ड्रेझिंग, वाहनतळ व जोडरस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. समुद्रातील पायलिंगची बहुतांश कामेही अद्याप अपुऱ्या अवस्थेत आहेत. मात्र, ठेकेदार जेट्टीचे काम अपूर्ण सोडून गेल्याने करंजा-रेवस रो-रो सेवेचे काम रखडले आहे. रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी आचारसंहिता संपुष्टात येताच आता नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या विलंबामुळे कामाच्या खर्चातही वाढ होणार आहे. निविदा प्रक्रीयेनंतर वर्षभराच्या कालावधीत रखडलेल्या करंजा-रेवस रो-रो सेवेचे काम पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई सागरी महामंडळाचे कार्यकारी अभियंता मनिष मेतकर यांनी दिली.







