सुरक्षात्मक उपाययोजनांचा अभाव; नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
| मंडणगड | प्रतिनिधी |
आंबडवे लोणंद या 965 डीडी राष्ट्रीय महामार्गावर शिरगाव येथील तिठा स्थानिकांसाठी प्राणघातक बिंदू ठरत आहे. मंडणगड-शेनाळे तसेच शिरगाव-पाट गावांमधून येणारी वाहने या तिठ्यावर एकत्र आल्याने सतत भीषण अपघात होत आहेत. वेगवान वाहने, वाढलेले गवत, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि कोणतेही सुरक्षात्मक उपाय न केल्याने येथे नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे.
परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तिठ्यावर संकेत फलक नाहीत, गतिरोधक किंवा झेब्रा मार्किंग नाही, रस्त्याच्या कडेला गवत दाट वाढले आहे. त्यामुळे अचानक समोर येणारी वाहने दिसत नाही. मंडणगड व शेनाळेकडून उतारावरून वाहने सुमारे 80 ते 100 स्पीडने झपाट्याने येतात. पाट किंवा शिरगावकडून रस्ता गाठणाऱ्यांना ती वाहने दिसायलाच उशीर होतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाण तर सतत वाढते आहे. रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात; काही वाहने जडवाहतूक (ट्रक, टिपर) असल्याने धोकाही अधिक. तरीही या तिठ्यासंबंधी कोणतेही वाहतूक सर्वेक्षण, ब्लॅक स्पॉट घोषित करणे, नव्या डिझाइनचा प्रस्ताव किंवा अपघात प्रतिबंधक उपाय अद्याप झाल्याचे दिसत नाही. एकीकडे शून्य अपघात मोहीमची घोषणा होत असताना प्रत्यक्षात अशा बिंदूंवर उपाययोजना न होणे हे गंभीर आहे.
मागील काही महिन्यांत याठिकाणी 21 जून, 18 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर रोजी 3 मोठे प्राणघातक अपघात झाले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर किरकोळ अपघातांची संख्या दर आठवड्याला वाढत आहे.
ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखण्याची वेळ
शिरगाव, पाट व आसपासच्या गावातील नागरिकांनी संबंधित विभागांना अनेकवेळा मागणी करूनही उपाययोजना न केल्याचा आरोप होत आहे. शिरगाव तिठा हा आता ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखण्याची वेळ आली आहे. योग्य वेळी कृती न केल्यास येथील अपघातांची मालिका आणखी भयावह होऊ शकते. सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणं महत्त्वाचं ठरेल. अन्यथा हा तिठा आणखी किती जीव घेणार, याचा अंदाजही लावता येणार नाही.
संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या अडचणी आणि अडथळाबाबत निवेदने देऊन सूचना केल्या आहेत. मात्र त्या पूर्ण करू असे सांगून वेळ मारून नेली आहे. त्यांच्या वर्तवणुकीवरून राष्ट्रीय प्राधिकरण निगरगट्ट असल्याचे दिसून आले आहे. गावांच्या नावाचे फलक, दिशादर्शक फलक आणि अपघातग्रस्त ठिकाणी कोणत्याही उपाययोजन केलेल्या नाहीत. पूर्णत्वास न गेल्यास आंदोलन करण्यात येईल.
– अरविंद येलवे, अध्यक्ष, संघर्ष समिती मंडणगड







