अवजड वाहतूक सुसाट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अपघात रोखण्याबरोबर, विद्यार्थी, नागरिक व पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मांडवा ते अलिबाग मार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी अटी-शर्तींवर बंदी घालण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी यांचे आदेश झुगारून या मार्गावरून अवजड वाहतूक सुसाट सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. अवजड वाहनांना अभय का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मांडवा येथे रो-रो जेटीसह अन्य प्रवासी जलवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकडून अलिबागला येणारे व अलिबागवरून मुंबईकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने अलिबाग, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आपली वाहने घेऊन येत असतात. अलिबाग ते मांडव्याला वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमच भेडसावत आहे. चोंढी व इतर ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांसह विद्यार्थी व पर्यटकांना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सोडविताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आजारी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडल्याने रुग्णाच्या जीवितास धोका संभावू शकतो.
अपघात कमी होण्यासाठी तसेच स्थानिक नागरिक, विद्यार्थी व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मांडवा जेट्टी ते अलिबाग या मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली. दररोज सकाळी आठ ते दुपारी बारा तसेच सायंकाळी चार ते रात्री आठ यावेळेत जड-अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, जीवनाश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता अन्य जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदीचे आदेश दिले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे आदेश काढण्यात आले होते. सुरुवातीच्या कालावधीत या नियमांचे पालन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला झुगारून अनेक अवजड वाहने या रस्त्यावरून सुसाट धावत आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवजड वाहने या रस्त्यावर बिनधास्तपणे सुरू असताना वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. अवजड वाहनांना अभय का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.







