वर्षातून दोनदा मोठ्या ओहोटीदरम्यान पडताहेत नजरेस
| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
छत्रपती संभाजीराजांच्या शौर्याने जंजिरा सहज जिंकता आला असता; परंतु महाराष्ट्रावर परकीयांची आक्रमणे चारही बाजूने झाल्याने किल्ले जंजिराऱ्याची मोहीम अर्धवट सोडावी लागली. परंतु, त्या आठवणी दगड स्वरूपात आजही राजपुरी किनाऱ्यावर पर्यटकांना पाहायला मिळतात.
मोगलांना पोर्तुगीजांनी केलेली ही मदत पोर्तुगीजांच्या आणि सिद्दीच्याही कालांतराने चांगलीच अंगाशी आली. 1682 च्या जून-जुलैमध्ये संभाजीराजांनी चौल (चेऊल) व रेवदंड्यास वेढा दिला, बरेच दिवस तो चालला. संभाजीराजांनी उत्तर कोकणातील दोन किल्ले जिंकून घेतले (1683), तसेच जुनी साष्टी व बारदेस येथेही चढाई केली. त्यांनी चौलचा वेढा उठवावा, म्हणून पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला. 1683 च्या डिसेंबरमध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांची अनेक गावे घेऊन फोंडा लढविला. सहा महिन्यांनंतर चौलचा वेढा उठविला. फोंड्याच्या लढाईत येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी यांनी मोठा पराक्रम गाजविला.
1682 ते 85 सालच्या सुमारास पाच हजार सैन्य असणारी गलबते नागोठणे, आणि पेण बंदरांमध्ये सज्ज होती. संभाजी महाराजांचे आरमार 120 गलबते आणि 15 गुराबांनी सज्ज होते. मराठ्यांनी सिद्दीची अनेक जहाजे उडवली व जबर नुकसान केले.
सेतूचे काम हाती
त्यानंतर महाराजांनी जंजिरा किल्ल्याभोवती एक सेतूच उभारण्याचे काम सुरु केले. यासाठी 5000 माणसे कामाला लागली. आठशे वार रुंद आणि तीस वार खोल असणारा खंदक दगड, कापूस, गाठोडी टाकून रस्ता तयार करण्यात आला. मात्र, हसन अलिखानने मराठ्यांच्या ताब्यातले कल्याण जिंकून घेतल्याने महाराजांना ही मोहीम दादाजी प्रभु देशपांडे यांच्याकडे सोपवून रायगडी यावे लागले. जंजिऱ्याला मराठा सैन्याचा वेढा असताना सिद्दीची काही जहाजे मुंबई बंदरात आली, तेव्हा महाराजांनी आपल्या खांदेरी येथील आरमाराला लुटण्याचे आदेश दिले.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
खरं तर, हा इतिहास जंजिरा किल्ल्यात अधिकृत प्रशक्षित गाईडने पर्यटकांना सांगणे गरजेचे आहे. परंतु, पुरातत्व खात्याने किल्ल्यातील माहिती फलकदेखील काढून टाकले आहे. किल्ल्याची पार दुर्दशा झाली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.







