| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तोंडावर एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत थेट 12,143 दुबार आणि संशयित मतदारांची नावे घुसल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केला आहे.
सदर नावे जिल्ह्याबाहेरील, म्हणजेच नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील असल्यामुळे आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त/प्राधिकृत अधिकारी (मतदार यादी) यांना तातडीने निवेदन देऊन या महागोंधळावर कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक मतदारच असणे कायद्याने बंधनकारक असताना, पनवेल मनपाच्या यादीत नवी मुंबईतील मतदारांचा ढीग आढळला आहे. बेलापूर मतदारसंघ (विधानसभा 151) ते पनवेल मनपा यादीत 6,138 दुबार/संशयित नावे तर ऐरोली मतदारसंघ (विधानसभा 190) ते पनवेल मनपा यादीत 6,005 दुबार/संशयित नावे असून, या संशयित मतदारांची संख्या एकूण 12,143 इतकी आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, विधानसभा मतदार याद्यांची प्रभागनिहाय फोड करून स्थानिक निवडणुकांची यादी तयार केली जाते.मात्र,पनवेल मनपाच्या यादीत जिल्ह्याबाहेरील मतदार घुसल्याने मतदानाच्या वैधतेवरच थेट आक्षेप घेण्यात आला आहे. प्रारूप यादीवर हरकती घेण्याची अंतिम मुदत 3 डिसेंबर 2025 होती.यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आढळली होती, पण त्यावेळी कोणतीही कठोर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे यंदा याच बोगस मतदारांच्या जीवावर निवडणुकीचे निकाल फिरवले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शिरीष घरत यांनी मागणी केली आहे की, या 12,143 दुबार मतदारांची कठोर शाहनिशा करावी आणि अंतिम यादीत त्यांच्या नावांसमोर विशिष्ट चिन्हांकन करावे. तसेच, मतदाराचे मतदान एकाच केंद्रात होण्यासाठी नियोजन करण्याची विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे. जर या त्रुटी वेळीच सुधारल्या नाहीत, तर संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेवर आणि निकालावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.







