| ठाणे | प्रतिनिधी |
अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करणाऱ्या मुंब्रा पोलिसांनी एका 42 वर्षीय व्यक्तीकडून तब्बल 1 कोटी 10 लाख 25 हजार रुपये किमतीचा चरस जप्त केला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याने हा चरस जम्मू-काश्मीरमधून विक्रीसाठी आणल्याचे तपासात उघड झाले आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या एनडीपीएस पथकातील अधिकारी आणि अंमलदार काळसेकर परिसरातील ऐरोली-मुंब्रा ब्रिज बोगद्याजवळील निर्जन ठिकाणी गस्त घालत असताना ही कारवाई झाली. मोहम्मद हारून हसरत अली सिद्धीकी (42) हा व्यक्ती संशयितरीत्या उभा असताना पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पिशवीत दोन किलो 205 ग्रॅम वजनाचा चरस अमली पदार्थ मिळून आला. सिद्धीकीविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्याला 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अटक केलेल्या मोहम्मद हारून सिद्धीकी याने जप्त केलेला चरस मोठ्या प्रमाणात जम्मू-काश्मीर राज्यातून ठाणे परिसरात विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर यापूर्वी राजस्थानमधील अजमेर येथेही गुन्हा दाखल आहे. पोलीस त्याचे जम्मू-काश्मीरमधील संपर्क आणि अन्य गुन्हेगारी नोंदी तपासत आहेत. कारवाईचा धडाका मुंब्रा पोलीस ठाण्याच्या एनडीपीएस पथकाने अमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. आतापर्यंत 324 सेवन करणाऱ्यांवर आणि 27 ताबा (विक्री) कारवाई करण्यात आली आहे. ताबा कारवाईत एकूण 3 कोटी 41 लाख 05 हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात यश आले आहे. विक्री व सेवन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी स्पष्ट केले.







