पनवेल – कर्जत रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत येथून पनवेल कडे जाण्यासाठी 2006 मध्ये मार्ग तयार झाला आणि त्या मार्गावरून प्रथम मालवाहू आणि नंतर प्रवासी वाहतूक सुरु झाली. मात्र, कर्जत – पनवेल मार्गावर उपनगरीय लोकल सेवा सुरु होण्यात अडचणी येत होत्या. शेवटी मध्य रेल्वे कडून ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि कर्जत- पनवेल मार्गावर चौक ते कर्जत असा वेगळा मार्ग बनवण्यात आला. या नवीन मार्गावर दुहेरी मार्गिका टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नवी मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असून, कर्जत- पनवेल मार्गावर उपनगरीय लोकल सेवा सुरु होणार त्यावेळी हा मार्ग प्रवासी वर्गासाठी सुलभ मार्ग समजला जाऊ शकतो.
रेल्वेमंत्री म्हणून मधू दंडवते यांनी कोकण मार्ग तयार करीत असताना कर्जत- पनवेल मार्गाला मंजुरी दिली होती. मात्र, त्यावेळी कर्जत- पनवेल मार्ग एकेरी बनविण्यात आला आणि त्यात या मार्गावर असलेल्या हालिवली वावर्ले बोगद्यातील दगडाचे मूल्य हे भुसभुशीत दगड अशा स्वरूपातील असल्याने त्या मार्गावर मागील 20 वर्षात एकदाही उपनगरीय लोकल चालविली गेली नाही. तर मालवाहू आणि एक्सप्रेस गाड्या यांच्यासाठी हा एकेरी मार्ग वापरात आहे. नवी मुंबई येथील औद्योग नगरीत नोकरी साठी जाणारे नोकरदार यांच्याकडून सातत्याने उपनगरीय लोकलची मागणी होत होती. शेवटी 2021 मध्ये रेल्वेकडून कर्जत- पनवेल मार्गावरील चौक पासून कर्जत असा नवीन मार्ग आणि पनवेल- कर्जत या मार्गावर दुपदरी मार्गिका टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती. कर्जत आणि पनवेल दरम्यान दुहेरी रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाचे काम जानेवारी 2021 मध्ये सुरू झाले. कोरोना महामारीमुळे सुरुवातीला या कामात अडथळा आला. मात्र, नंतर या 29.6 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले.
मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन कडून मागील पाच वर्षांत या प्रकल्पाचे 80 टक्के काम केले आहे. या मार्गावर पनवेल, मोहोपे, चिखले, चौक आणि कर्जत अशी पाच रेल्वे स्थानके आहेत. या सर्व स्थानकांची कामे ही अंतिम टप्प्यात आहेत. कर्जत-पनवेल या रेल्वे मार्गाच्या डबलिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लोहमार्ग, तीन बोगदे, 44 लहान मोठे पूल आणि 15 भुयारी मार्गिका यांचे काम सुमारे 80 टक्के पूर्ण झाले आहे. उरलेले 20 टक्के काम लवकरात लवकर पूर्ण करून मार्च 2026 पासून या मार्गावरून लोकल चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी या मार्गावर येत्या फेब्रुवारीमध्ये सीआरएसची चाचण्या होणार आहेत. हा मार्ग सुरू झाल्यानंतर कर्जत- पनवेल प्रवास सुसाट होणार असून, कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या प्रवासाचा कालावधी व्हाया पनवेलमार्गे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. कर्जत-पनवेल दरम्यान दुहेरी मार्गावर रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर लोकल सेवेचा वेग वाढणार आहे. सध्या या मार्गावर प्रवासी गाड्यांची संख्या कमी आहे. मालवाहतूक करणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात चालवल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कर्जत या प्रवासासाठी जलद लोकलने दोन तासांचा तर धीम्या लोकलने अडीच तासांचा कालावधी लागतो. कर्जत- पनवेल दुहेरी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी व्हाया पनवेल या प्रवासासाठी 30 मिनिटांचा प्रवास कमी होणार आहे.
उपनगरीय रेल्वे सेवेत सर्वात लांब बोगदा…
कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावर मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून वावर्ले, नढाल आणि किरवली या तीन ठिकाणी तीन बोगदे तयार केले आहेत. त्यापैकी वावर्ले बोगद्याची लांबी ही पावणेतीन किलोमीटर म्हणजे 2700 मीटर एवढी आहे. हा किरवली येथील बोगदा मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत सर्वात मोठा ठरला आहे. यापूर्वी मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान असलेला पारसिक बोगदा सर्वाधिक लांब म्हणून ओळखला जात होता. या बोगद्याची लांबी 1 हजार 300 मीटर आहे. कर्जत-पनवेल मार्गावरील नढाल बोगद्याची लांबी 219 मीटर तर किरवली येथील दुसऱ्या बोगद्याची लांबी 300 मीटर इतकी आहे.







