| रायगड | प्रतिनिधी |
तो आला, त्यानं पाहिलं, दहशत माजवली आणि तो गेला… हा संपूर्ण प्रकार अलिबागचा वनविभाग आणि पोलीस पाहात होते. बिबट्या समोर दिसतो आहे. अशावेळी वन विभागाकडे त्या दहशत माजविणाऱ्या बिबट्याला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी लागणारी यंत्रणा नव्हती, हे विशेष. संपूर्ण दिवसभर बिबट्याने नागावमधील परिसरात मुक्तसंचार केला. बिबट्याला पकडण्यासाठीची यंत्रणा आली खरी; पण तोपर्यंत अंधार पडू लागल्याने बिबट्याने स्वतःसाठी सुरक्षित जागा शोधली आणि गायब झाला. पोलीस प्रशासन आणि वन विभाग यांचे बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न फेल गेल्याने नागाव ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. मंगळवारी गावातून पळालेला बिबट्या बुधवारी परिसरात दिसेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, ही शक्यतादेखील बिबट्याने फोल ठरवली. यामुळे हळूहळू नागाव रुळावर आले.
नागाव परिसरात दिसलेल्या बिबट्यामुळे स्थानिकांमध्ये निर्माण झालेली भीती अद्यापही कायम आहे. बिबट्याचे पहिले दर्शन झाल्यानंतर 24 तासांहून अधिक वेळ उलटला असला तरी त्याला पकडण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असून, गावात सतत चर्चेला ऊत आला आहे. घटनेनंतर लगेचच वनविभागाने शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 80 कर्मचारी आणि अधिकारी परिसरात गस्त घालत आहेत. विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून, रात्री आणि पहाटेच्या सत्रात शोध वाढवण्यात आला. मात्र, संध्याकाळनंतर बिबट्या कुणाच्याच नजरेस न पडल्याने तो नागावच्या सीमारेषेबाहेर जाऊन आपल्या नैसर्गिक अधिवासाकडे परतला असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. तरीही, या अंदाजाला पुष्टी मिळेपर्यंत शोधमोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून, अनावश्यक बाहेर जाणे, विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळण्यास सांगितले आहे. वनविभागाच्या पथकाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, बिबट्या खाद्याच्या शोधात आला असला तरी त्याने मनुष्य प्राण्यावर हल्ला चढवला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत सहा जण जखमी झाले आहेत. यामध्ये बापूसाहेब जावळे, मंदार गडकरी, अमित वर्तक, कुणाल साळुंखे, प्रसाद सुतार आणि अनिकेत पाटील यांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर उपचार करण्यात आले आहेत.
नागावमध्ये बिबट्या आल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने वन विभागाने बिबट्याला शोधण्याची मोहीम हाती घेतली. बिबट्याला पकडण्यासाठीची टीम बोलावण्यात आली होती. बिबट्या लोकवस्तीत असल्याने त्याला पकडण्यासाठीची योग्य संधी आणि जागा सापडत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये अंधार पडल्यानंतरदेखील शोधमोहीम सुरु ठेवण्यात आली आहे. बिबट्या दिसल्याची बुधवारी चर्चा ऐकू येत होती; परंतु ठोस पुरावे सापडत नव्हते. यामुळे शोधमोहीम सुरु ठेवली आहे. बिबट्या हा वन्यप्राणी असल्याने तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात गेला असल्याची शक्यता आहे. असे असले तरी बिबट्याची शोधमोहीम सुरु ठेवणार आहोत.
-राहुल पाटील,
उपवनसंरक्षक, अलिबाग-रायगड







