| रसायनी | प्रतिनिधी |
भारत सरकारच्या अटल अकॅडमी वाणी या उपक्रमांतर्गत पिल्लई एचओसी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, रसायनी संस्थेत अटल वाणी या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा उद्देश मराठी भाषेतून शिक्षक, संशोधक व अभ्यासक यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहांची जाणीव करून देणे व त्यांच्या अध्यापन आणि संशोधन कार्यात त्यांचा प्रभावी उपयोग करता येईल यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा होता. दि. 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2025 या कालावधीत आयोजित या कार्यशाळेत नामवंत तज्ज्ञ वक्त्यांनी आपले विचार मांडले. त्यांनी औद्योगिक 4.0 मधील उदयोन्मुख संधी, डिजिटल शिक्षण साधनांचा वापर, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती तसेच संशोधनातील नवे दृष्टिकोन या विषयांवर सखोल माहिती दिली. प्रत्येक सत्रानंतर सहभागींसोबत संवादात्मक चर्चा झाली, ज्यामुळे शिक्षक व संशोधकांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिकण्याची संधी मिळाली. या कार्यशाळेला पन्नासहून अधिक प्राध्यापक व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.







