मुस्लिम तरुणाने अपघातग्रस्त कॉलेज तरुणीला वैद्यकीय मदत
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात नेरळ भागात मुस्लिम आणि हिंदू धर्मीय यांच्यातील वातावरण काही प्रकरणामुळे दूषित झाले आहे. मात्र, आपल्या समोर महाविद्यालयीन तरुणीला धडक देऊन दुचाकी चालक गायब झाला, परंतु एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्या ठिकाणी असलेले मुस्लिम तरुण साकिब पोंजेकर यांनी क्षणाचा ही विलंब न करता त्या तरुणीला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान प्रथम नेरळ आणि नंतर बदलापूर येथे उपचार घेऊन ही कॉलेज तरुणी आता सुखरूप आपल्या घरी परतली आहे.
मागील काही महिन्यात नेरळ, ममदापूर, भडवल, दामत आणि शेलू परिसर हिंदू मुस्लिम धर्मीय यांच्यात किरकोळ कारणाने वाद होत होते. मात्र, मागील दोन महिन्यात ही परिस्थिती काहीशी सुधारली आहे. त्यात नेरळ पोलीस ठाण्याची महत्वाची भूमिका असून, मुस्लिम तरुणाच्या माणुसकीच्या कार्यामुळे हिंदू मुस्लिम धर्मीय अधिक जवळ येण्यास मदत झाली आहे.
ममदापूर गावातील सातबारा म्हणून ओळखला जाणारा तरुण साकिब पोंजेकर आपल्या कामासाठी नेरळ खांडा येथील सेंटर वन बिल्डिंग समोर उभा होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेलू जवळील बांधिवली येथे राहणारी कॉलेज तरुणीला एका दुचाकीने धडक दिली. काही समजण्याच्या आधी तो दुचाकी चालक तेथून पळून गेला. मात्र, जखमी कॉलेज तरुणीला साकिब पोंजेकर याने समोरून येणारी टॅक्सी थांबवून त्या टॅक्सी मध्ये त्या जखमी तरुणीला डॉ शेवाळे यांच्या रुग्णालयात दाखल केले. रस्त्याने चालणाऱ्या तरुणीला धडक देऊन पसार झालेल्या दुचाकी चालकास नेरळ पोलिसांनी शोधून काढले आहे. दरम्यान, सदर तरुणी ही नेरळ येथे प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी बदलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सध्या ही कॉलेज तरुणी आपल्या घरी विश्रांती घेत आहे. या माणुसकीच्या दर्शनाबद्दल मुस्लिम धर्मीय तरुण साकिब पोंजेकर यांचे कौतुक होत आहे.







