। उत्तर प्रदेश । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील यमुना एक्सप्रेस-वेवर एक भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि.16) रात्री दोन वाजता घडली आहे. 7 बस आणि 3 कारची धडक झाली आहे. हा अपघात होताच वाहनांना भीषण आग लागली. यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
दाट धुक्यामुळे अनेक वाहने एकमेकांना धडकली आणि वाहनांची टक्कर झाल्यानंतर अनेक वाहनांना आग लागली. त्यामुळे वाहनांमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती. हा अपघात आग्रा–नोएडा मार्गावर बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेहरा गावाजवळ, माईलस्टोन क्रमांक 127 जवळ घडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या 25 प्रवाशांना रुग्णवाहिकांद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, बसमधील उर्वरित प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. 12 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 14 हून अधिक रुग्णवाहिका तात्काळ तैनात करण्यात आल्या होत्या. या भीषण अपघातामुळे यमुना एक्स्प्रेस वे वर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्ववत करण्यात आली.







