राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग; एक कोटी रुपयांचे बक्षीस
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील खारघर येथे 1 कोटी रुपये बक्षीस असलेली गोल्फ कोर्स स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला वलय निर्माण झाले आहे. सिडको आणि द प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया यांच्या संयुक्तपणे लार्सन अँड टुब्रोद्वारे सादर केलेल्या पहिल्या सिडको ओपन गोल्फ कोर्स स्पर्धा खारघरमधील गोल्फ कोर्स व्हॅलीमध्ये 16 ते 19 डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. तसेच, या स्पर्धेत 1 कोटी रुपयांचे बक्षीस असल्याचे सिडकोचे व्यस्थापकीय संचालक अशोक सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
खारघर येथील सिडकोच्या गोल्फ कोर्स व्हॅलीमध्ये प्रथमच गोल्फ कोर्स स्पर्धा रंगणार असून स्पर्धेत 126 व्यावसायिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा स्ट्रोक-प्ले स्वरूपात खेळवली जाणार आहे. प्रत्येकी 18 होलच्या चार फेऱ्या असणार आहेत. दोन फेऱ्यांनंतर त्यातून 50 अव्वल खेळाडू निवडले जाणार आहेत. या स्पर्धेत युवराज संधू, अर्जुन प्रसाद, मनू गंडास, अंगद चीमा, खलिन जोशी आणि ओम प्रकाश चौहान हे आघाडीचे खेळाडू असणार आहेत. विशेष म्हणजे, या खेळात नवी मुंबईतील मनोज कुमार, मयूर ठाकूर आणि पंकज ठाकूर आणि मुंबईचा अनिल बजरंग माने याचाही समावेश आहे.
18 होल मैदानावर स्पर्धा
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले की, सिडको ओपन 2025 ही आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धा आयोजित करताना आनंद होत आहे. ही एक आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धा आहे. उदयोन्मुख खेळाडूला प्रोत्साहन देणारी आहे. तसेच, सिडकोने तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय गोल्फ मैदानातील 18 होल मैदानावर स्पर्धा रंगणार आहे. ही स्पर्धा जागतिक दर्जाची असून नवीन गोल्फ खेळाडूसाठी हे जागतिक उद्याच्या जागतिक व्यासपीठ प्रदान करणारी आहे. गोल्फ कोर्स स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमास माजी क्रिकेटपटू कपिल देव उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याचे विजय सिंघल यांनी सांगितले.
विदेशी खेळाडूही लढणार
गोल्फ कोर्स स्पर्धेत श्रीलंकेचे एन. थंगाराजा आणि के. प्रबागरन, बांगलादेशचे जमाल हुसेन, मोहम्मद सिद्दीकुर रहमान, बादल हुसेन, नेपाळचे सुभाष तमांग या विदेश खेळाडूंचा समावेश असणार आहेत. तसेच, मुर्बी गावातील पंकज ठाकूर हे खारघरमधील गोल्फ कोर्समध्ये बॉलपिकर कामगार म्हणून काम करीत होते. आता ते गोल्फ प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी मुंबई, हैदराबाद, बंगळूरमध्ये या खेळाची चुणूक दाखवली आहे.







