| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग क्रमांक 4च्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा जिमखाना समिती प्रमुख डॉ. रवींद्र चिखले व इतर समिती सदस्यांनी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील व प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. या स्पर्धेत यजमान जेएसएम महाविद्यालयाने जेतेपद पटकावले असून त्यांच्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास होण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठामार्फत दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून जेएसएम महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग क्रमांक 4च्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या फुटबॉल स्पर्धेत कोकण विभागातील एकूण 4 संघ सहभागी झाले होते. या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील व उपप्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जेएसएम महाविद्यालयाने पटकावले असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या वेळी मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीचे प्रमुख समीर गाडगीळ तसेच प्रथमेश पाटील, रितेश ठाकूर, श्रेयश पाटील, साहिल कांबळे हे मॅच रेफ्री म्हणून उपस्थित होते. स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.







