| आगरदांडा | प्रतिनिधी |
रांगोळी विश्वात दोन जागतिक विक्रम केल्यानंतर नांदगावच्या अनिरुद्ध खेडेकर या प्रसिद्ध रंगावलीकाराने पुन्हा एकदा तिसऱ्या जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने डोक्यावर चाळणी घेतलेल्या बालकाची हायपर-रिअलिस्टिक पोर्ट्रेट रांगोळी साकारल्याबद्दल पुन्हा एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. तसेच, त्यांच्याद्वारे या कार्यासाठी अनिरुद्ध यांना ‘आय.बी.आर. अचिव्हर’ ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली.
अनिरुद्ध खेडेकर याने साकारलेल्या ‘कवडसा’ या रांगोळीत बालकाच्या शरीरावर पडलेल्या प्रकाश व सावलीच्या सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या छटा अत्यंत प्रभावीपणे चित्रित केल्या होत्या. छाया प्रकाशाचे अक्षरशः जिवंत वर्णन करणारी ही रांगोळी रेवदंडा येथील श्री कालभैरव जयंतीनिमित्त दि. 12 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत येथील मंदिरात प्रदर्शनासाठी देवण्यात आली होती. याची अधिकृत नोंद 22 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. त्यामुळे अनिरुद्धच्या या तिसऱ्या जागतिक विक्रमाबद्दल नांदगावमधील अनेकांनी त्याचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.







