। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
वारंवार पत्र व्यवहार करुनही व्यापारी 50 किलो पेक्षा जास्त माल मागवत असल्याने संतापलेल्या एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी मंगळवारी (दि.16) काम बंद आंदोलन केले. त्यामुळे जोपर्यंत 50 किलोपेक्षा कमी माल बाजार आवारात येणार नाही; तोपर्यंत माथाडी कामगार माल खाली करणार नाही, असा पवित्राच माथाडी कामगारांनी घेतला आहे. सकाळपासून कांदा बटाटा मार्केट बंद करुन माथाडी कामगार आंदोलन सुरू केला आहे.
वाहतूक करण्यात येणार्या मालाचे वजन 50 किलोपेक्षा अधिक नसावे. ही मागणी वारंवार करुनही अधिक वजनाच्या गोणी येत असल्याने माथाडी कामगार आज अधिकच संतापले आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच माथाडी कामगारांनी काम बंद केले आहे. 50 किलोपेक्षा अधिक क्षमतेच्या गोणी मालाची वाहतूक करु नये, असा शासनाचा जीआर असताना एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. शासनाच्या जीआरनुसार 50 किलो वजनाचा गोणी अपेक्षित असताना काही व्यपार्यांकडे 60 ते 65 किलो वजनाचा माल येत आहे. गेली दोन वर्षपासून संबंधित घटकांशी वारंवार बैठक घेऊन देखील शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे माथाडी कामगारांनी सांगितले.