| चणेरा | प्रतिनिधी |
मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तणाव कमी होऊन कामासाठी नवी ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी केले. तसेच, महावितरणचे काम जबाबदारीचे व तणावपूर्ण असून, कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. 24 तास अखंडित वीजपुरवठा देताना येणारा ताण कमी करण्यासाठी अशा एकत्रित मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन उपयुक्त ठरते, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित पेण मंडळामार्फत ‘मनोरंजनाचा भव्य सोहळा’ बुधवारी (दि.18) रोह्यातील सी.डी. देशमुख नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता प्रदीप डाळू यांनी केले. अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांनी महावितरणच्या प्रगतीचा आढावा घेताना, नव्या तंत्रज्ञानामुळे कंपनीने दर्जेदार व विश्वासार्ह सेवा देण्यात यश मिळवले असल्याचे नमूद केले. यावेळी डॉ. दत्ता कोहीनकर यांनी ‘मनाची अमर्याद शक्ती व ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर, अमित गायकवाड यांनी मेडिक्लेमविषयी माहिती दिली. कार्यक्रमात रंगमित्र संस्कृतीक कला मंडळ, इंदापूर निर्मित ‘बाप पण भारी देवा’ हा विनोदी व भावनिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. रोहा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. मनोरंजन, मार्गदर्शन व कुटुंबीयांचा सहभाग यामुळे हा सोहळा महावितरण कुटुंबासाठी संस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाला पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, सहाय्यक महाव्यवस्थापक नमिता गजदर, कार्यकारी अभियंते प्रदीप डाळू, रामकृष्ण पाटील, शैलेशकुमार सिंह, विद्यासागर शिंदे, उमेश चव्हाण, प्रवीण साळी, मंडळ व्यवस्थापक संगीता गंभीर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कुटुंबीय व ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.







