| उरण | प्रतिनिधी |
उरण विधानसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता, त्यांची बाजू न ऐकता कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांनी प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून विनोद साबळे यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती कोणालाही विश्वासात न घेता केल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यातच आ. थोरवेंकडून काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम सुरू असल्याचा व शिवसेना पक्षवाढीला विरोध करून वारंवार मनमानी, एकतर्फी कारभार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आ. थोरवे यांच्या मनमानी व एकतर्फी कारभाराचा निषेध म्हणून मतदारसंघातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपले सामूहिक राजीनामे देत निषेध केला आहे.
उरण तालुका प्रमुख दिपक ठाकूर व पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे वरिष्ठांकडे सुपूर्द केले आहेत. उरण व पनवेल तालुक्यातील दोन्ही तालुका प्रमुखांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गेली अनेक वर्षे शिवसेना पक्षात असणाऱ्या व एकनिष्ठ, प्रामाणिकपणे, कोणताही स्वार्थ न बाळगता काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय या घटनेतून समोर येत आहे. पक्षवाढीसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या उरण विधानसभा जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून बाजूला केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाला मोठा फटका बसण्याची चिन्ह दिसत आहे.







