अदृश्य इमारती, बोगस मतदार आणि कोरे ओळखपत्र; मुंबईत काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
| मुंबई | प्रतिनिधी |
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदार याद्यांमधील मोठ्या त्रुटींवरून गुरुवारी (दि.18) काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन वेळा निवडून आलेल्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आज अदृश्य इमारती, अस्तित्वात नसलेले मतदार आणि कोरे एपिक कार्ड यांचा वापर करून सुरू असलेल्या एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. हा घोटाळा म्हणजे आगामी निवडणुकीच्या निकालात फेरफार करण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगामध्ये असलेले साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शीतल म्हात्रे यांनी सांगितले की, सत्ताधारी भाजप निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेचा गैरफायदा घेऊन मुंबईतील लोकशाही पायदळी तुडवण्यासाठी मतदार याद्या पद्धतशीरपणे दूषित करत आहे.
अस्तित्वात नसलेल्या इमारतीत 143 मतदार या तपासणीत प्रामुख्याने ‘भागडालाने’ नावाच्या इमारतीचे उदाहरण समोर आले आहे. अधिकृत मतदार यादीनुसार, ही इमारत आयसी कॉलनी, रोड नंबर 5 येथे दाखवण्यात आली असून तिथे 143 मतदार नोंदणीकृत आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्या ठिकाणी अशी कोणतीही इमारत अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर बोलताना म्हात्रे म्हणाल्या की, ही इमारत फक्त कागदावर आणि मतदार यादीतच अस्तित्वात आहे. ती मुंबईतील सामान्य नागरिकांना दिसत नाही, पण निवडणूक आयोगाला मात्र स्पष्टपणे दिसत आहे. ही निव्वळ संघटित वोट चोरी आहे.
“मतदार यादीच्या प्रारूप टप्प्यावर आम्ही अधिकृतपणे हरकती नोंदवल्या होत्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी या त्रुटी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अंतिम यादीत आमच्या हरकतींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता आम्हाला सांगितले जात आहे की नावे वगळता येणार नाहीत. हा लोकशाहीचा थट्टा आहे,“ असे म्हात्रे यांनी नमूद केले. निवडणूक आयोग आता स्वतंत्र घटनात्मक संस्था म्हणून नाही, तर भाजपची निवडणूक यंत्रणा म्हणून काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोरे मतदान कार्ड
‘ब्लँक चेक’सारखा प्रकार हा घोटाळा केवळ एका इमारतीपुरता मर्यादित नाही. म्हात्रे यांनी उघड केले की, केवळ वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 100 हून अधिक अशा मतदारांची नावे आहेत ज्यांच्या इमारतींचा पत्ता अपूर्ण आहे किंवा दिलेलाच नाही. धक्कादायक म्हणजे, त्यांनी अशा कोऱ्या मतदान पत्रांचे पुरावे सादर केले, ज्यावर फक्त एपिक क्रमांक आहेत, पण मतदाराचे नाव किंवा पत्ता नाही.
मुंबईकरांचे हक्क चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकार विरोधात काँग्रेस आपला लढा सुरूच ठेवेल आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरेल.
– शीतल म्हात्रे, नगरसेविका







