रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाकडून जनजागृती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
किड नियंत्रणासाठी वेगवेगळ्या रासायनिक व धोकादायक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. किटक नाशकांच्या आयोग्य मात्राचा पिकांबरोबरच मानवी आरोग्यावर परिणाम होतो. किटक नाशकांच्या आयोग्य मात्राचा धोका टाळण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने पुढाकार घेत जनजागृती सुरू केली आहे. किटकनाशक फवारणी करताना काळजी घेण्याचे आवाहन कार्यशाळेच्या माध्यमातून केले असून, विक्रेत्यांना देखील सुचना करण्यात आल्या आहेत.
राज्यात किड नियंत्रणासाठी वेगवेगळ्या रासायनिक व धोकादायक किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अयोग्य मात्रा, हाताळणीमुळे शेतकरी शेतमजूर यांना विषबाधा होण्याची भिती कायमच असते. पर्यायाने मृत्यू होण्याची चिंतादेखील असते. राज्यातील काही जिल्ह्यामध्ये धोकादायक किटकनाशकांच्या अतिवापराबरोबर आयोग्य वापरामुळे शेतमजूर व शेतकरी यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, नागरिकांना विषमुक्त भाजीपाला लागवड करता यावे, यासाठी रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 87 हजार हेक्टर भात पिकांचे क्षेत्र असून भात पिकांबरोबरच कडधान्य, भाजीपाला तसेच पांढरा कांदा लागवड जिल्ह्यात या कालावधीत करण्यास सुरुवात झाली आहे. भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नुकतीच रब्बी हंगाम कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेच्या माध्यमातून कीटकनाशके वापराबाबतची माहिती दिली. जिल्ह्यात 136 कीटकनाशके विक्रीची दूकाने आहेत. या दुकानदारांशी संवाद साधत त्यांना धोकादायक कीटकनाशके विक्री करू नये अशा सुचना दिल्या. शेतकऱ्यांना योग्य किटक नाशकांचा औषधे खरेदीसाठी मार्गदर्शन करण्याबाबत सांगितले आहे.
त्यामुळे जिल्ह्यामध्ये कृषी विभागामार्फत जनजागृती सुरु करण्यात आली आहे. यातून विषमुक्त भाजीपाला उत्पादनावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ही घ्यावी शेतकऱ्यांनी काळजी
कीटकनाशके खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून पावती घ्यावी. खरेदी केलेल्या कीटकनाशकांचे पिशवी, खरेदीची पावती व थोडे कीटकनाशक जपून ठेवावे. कीटकनाशक लेबल वर बॅच क्रमांक, नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख व अंतिम मुदत तपासूनच सीलबंद असलेले कीटकनाशक खरेदी करावे. कीटकनाशक बंद कुलूप असलेल्या हवा खेळती असलेल्या ठिकाणी ठेवावे. एका विशिष्ट क्षेत्रासाठी आवश्यक तेवढेच कीटकनाशक खरेदी करावे. कधीही अन्नाच्या वस्तू फळे भाज्याबरोबर वाहतूक करू नये. वापर करताना शिफारस केलेल्या डोस प्रमाणे द्रावण तयार करावे. द्रावण तयार करताना काठीचा वापर करावा. कीटकनाशक हाताळताना मिश्रण तयार करताना व फवारणी करताना संपूर्ण शरीर झाकण्यासाठी संरक्षक कपड्याचा वापर करावा. फवारणीनंतर स्प्रेअर व उपकरणे, वापर केलेले कपडे साबणाने स्वच्छ धुवावे. हात पाय चेहरा साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. कीटकनाशके फवारलेल्या शेतात जनावरांना कमीत कमी 15 दिवस चरायला सोडू नये. त्वचेवर कीटकनाशक सांडल्यास 15मिनिटे त्वचा धावत्या पाण्याखाली साबणाने स्वच्छ धुवावी. डोळ्याची संपर्क आल्यास डोळे 15 मिनिटे पाण्याने स्वच्छ धुवा. किटकनाशकांचा अतिवापर केल्यास आरोग्यासह पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो.







