हर्षदा मयेकर यांची निवेदनद्वारे चौकशीची मागणी
| रेवदंडा | प्रतिनिधी |
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम जाणीवपूर्वक रखडून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचीत ठेवल्याचा आरोप नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा मयेकर यांनी केला आहे. याबाबत राजिप पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले असून त्याबाबत चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात, अलिबाग तालुक्यातील नागाव गावासाठी जल जीवन मिशन अंतर्ग मंजूर करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात पुर्ण झालेली नाही. तसेच, सध्या हे काम पुर्णतः बंद अवस्थेत आहे. त्यामुळे हे अंत्यत गंभीर व लज्जास्पद असून लोकहिताचा पुर्णतः विरोधात आहे. या कामाची सुरूवात ठेकेदार विवेक पाटील यांच्या मार्फत करण्यात आली होती. परंतु, त्यांच्याकडून कोणतेही कारण न देता तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांनी हे काम पुणे येथील दुसऱ्या ठेकेदाराला हस्तातंरीत केले. त्यामुळे हे हस्तांतर कोणाच्या आदेशाने, कोणत्या नियमाखाली व कोणत्या अटीवर करण्यात आले, याबद्दलची कोणतीही माहिती आजतागायत देण्यात आलेली नाही. शिवाय हे काम हस्तातंरीत होऊन अनेक महिने उलटून गेले असतानाही प्रत्यक्ष कामास सुरूवात झालेली नाही. परिणामी समस्त नागाव वासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून महिला, वृद्ध व लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाण्यापासून वंचीत ठेवणे हे संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्काचे थेट उल्लंघन आहे. ही परिस्थिती केवळ निष्काळजीपणाची नसून संबधीत ठेकेदार, अधिकारी व यंत्रणामधील दुर्लक्ष, अकार्यक्षमता व संभाव्य संगनमत दर्शविते. शासन निधीचा गैरवापर, कागदपत्री प्रगती दाखवून प्रत्यक्षात काम न करणे व शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची बदनामी करणे आहे, असे गंभीर आरोप उपस्थित होत असल्याचेही म्हटले आहे.
तसेच, या निवेदनावर सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास याबाबत जिल्हाधिकारी, राज्य जलजीवन मिशन कार्यालय, लोकायुक्त यासह प्रसारमाध्यमांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल. त्याची संपुर्ण जबाबदारी संबधीत विभागावर राहील. तसेच, हे निवेदन पत्र अंतिम इशारा स्वरूपाचे असून यानंतर कोणतीही पुर्व सुचना न देता कायदेशीर मार्ग अवंलबण्यात येईल, असा इशारा सरपंच हर्षदा मयेकर यांनी निवेदन देतेवेळी दिला आहे.
अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
या निवेदनपत्राद्वारे हे पाणी पुरवठा काम तात्काळ सुरू करून निश्चित कालमर्यादीत पुर्ण करण्याचे लेखी आदेश देण्यात यावेत किंवा सध्यस्थितीत हस्तांतरीत केलेल्या ठेकेदार रद्द करून ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन विश्वासू ठेकेदार नियुक्त करण्यात यावा. काम हस्तातंरीत करण्याप्रकरणाची सखोल व स्वतंत्र चौकशी करून दोषी ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. ग्रामस्थांना तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात पाणी टँकरची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच, आजपर्यंत झालेल्या विलंबाबाबत स्पष्ट खुलासा देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.







