निरीक्षक बेशिस्त, मुख्याधिकारी मूग गिळून
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरात आज आरोग्य सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडालेला असताना, या संपूर्ण गैरकारभाराला जबाबदार असलेले आरोग्य निरीक्षक आणि मुख्याधिकारी मात्र डोळ्यावर काळी पट्टी बांधून बसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. जनतेच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासन मात्र ठेकेदारांचे बिले काढण्यात मश्गुल असल्याचा आरोप नागरिक उघडपणे करत आहेत.
शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग, तुंबलेले नाले, भीषण दुर्गंधी आणि डासांचे साम्राज्य हे रोजचे चित्र झाले आहे. परिणामी मलेरिया, डेंग्यू, ताप, सर्दी, खोकला यांसारख्या साथीच्या आजारांनी उरणकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असताना आरोग्य निरीक्षक हरेश तेजी हे नेमके काय करत होते, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
आरोग्य निरीक्षकांनी कर्तव्य बजावले असते, तर डासांचे थवे औषध फवारणीच्या एका फेरीनंतर उडून गेले नसते. तक्रार झाल्यानंतरच औषध फवारणीसाठी कामगार पाठवणे म्हणजे आधी निष्काळजीपणा आणि नंतर दिखाऊ कारवाई, याचे जिवंत उदाहरण उरणकरांनी पाहिले.
याहून गंभीर बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकारात मुख्याधिकारी यांची संशयास्पद शांतता. आरोग्य निरीक्षकांचे अपयश, नागरी आरोग्य सुविधांचा ढासळलेला कारभार आणि जनतेतून उठणारा आक्रोश हे सर्व माहिती असतानाही मुख्याधिकारी कारवाई का करत नाहीत? की या हलगर्जीपणाला वरूनच अभय दिले जात आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
याबाबत उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी याबाबतची तक्रार करून वृत्त प्रसिद्ध करताच त्वरित आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांनी औषध फवारणी करण्यासाठी म्हात्रे नावाच्या तरुणाला पाठविले. त्यांनी नाल्यावर फवारणी करताच डासांचा थवाच्या थवा उडून गेला असल्याचे खुद्द कामगार म्हात्रे यांनीच मला प्रत्यक्षात दाखविले. यावरून आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांना उरणच्या जनतेच्या आरोग्याचे देणंघेणं नसल्याचे उघड होते.
नाक दाबल्यावरच तोंड उघडणारी ही प्रशासनाची संस्कृती उरणकरांना आता नकोशी झाली आहे. जनता आवाज उठवेल तेव्हाच अधिकारी कामाला लागतात, अन्यथा शासनाचा पगार, ठेकेदारांची टक्केवारी आणि बिले काढण्यातच समाधान अशी चर्चा शहरात जोर धरत आहे. उरणकरांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू राहिला, तर याची जबाबदारी केवळ आरोग्य निरीक्षकांपुरती मर्यादित राहणार नाही, तर मुख्याधिकारी आणि संपूर्ण नगरपालिकेवर जाईल, हे स्पष्ट आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून दोषींवर ठोस कारवाई केली नाही, तर जनतेचा रोष रस्त्यावर उतरण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा नागरिक देत आहेत.






