| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रांजणखार येथील दत्तात्रेय गणू पाटील यांचे मंगळवारी (दि.16) वयाच्या 88 व्या वर्षी एमजीएम कळंबोली येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भुवनेश्वर येथील वैकुंठ धाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंड असा खूप मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य 26 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता भुवनेश्वर येथे व होम हवन राहत्या घरी रांजणखार नाका येथे होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
दत्तात्रेय पाटील हे मुंबई हकोबा एम्ब्रॉईडरीमध्ये कामाला होते. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत होते. त्यांच्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावामुळे ते खारेपाठ विभागामध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. तसेच ते रांजणखार ग्रामस्थ मंडळाचे बरेच वर्ष अध्यक्ष होते. सेवानिवृत्तीनंतर शेतकरी म्हणून आयुष्याची वाटचाल करत असताना वाचनाची व क्रिकेट पाहण्याचा छंद त्यांनी जोपासला होता. उत्कृष्ट वक्तृत्व असल्याने मित्रमंडळी ना एकत्र करून चर्चा करणे, एकत्र वाचन करून त्यांनी वाचन संस्कृती जतन केली होती.







