| ढाका | वृत्तसंस्था |
बांगलादेशमध्ये निवडणुकांची घोषणा झाली असून, सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. अशातच राजकीय नेत्यांवरील हल्लेदेखील वाढले आहेत. उस्मान हादीनंतर आता शेख हसीना यांच्या आणखी एका कट्टर विरोधकावर गोळीबार झाला आहे. मोतलेब सिकंदर असे या नेत्याचे नाव असून ते नॅशनल सिटीझन पार्टीचे प्रमुख नेते असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेश येथील खुलना येथे सोमवारी (दि.22) निवडणूक प्रचार सुरू असताना मोतलेब सिकंदर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी त्यांच्या मानेला गोळी लागली आणि त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. दरम्यान, सिकंदरवर झालेल्या गोळीबारानंतर एनसीपी नेत्या महमूदा मितू म्हणाले की, एनसीपीचे खुलना मंडळ प्रमुख मोतलेब सिकंदर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना खुलना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले.






