| नवी मुंबई | प्रतिनिधी |
स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असताना, देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत सातत्याने पुढे असणाऱ्या नवी मुंबईत मात्र वास्तव पूर्णतः वेगळे चित्र दाखवत आहे. पारसिक हिल, बेलापूर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दुर्दैवी, धोकादायक व प्रशासनाच्या बेपर्वाईचे प्रतीक ठरत आहे.
पारसिक हिल परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक, पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण तसेच संध्याकाळी विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी केवळ एकच सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध आहे. मात्र या एकमेव स्वच्छतागृहाची दैनंदिन देखभाल पूर्णतः दुर्लक्षित असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
स्वच्छतागृहात पाणीपुरवठा अनियमित असून वीज कनेक्शन जाणीवपूर्वक तोडून ठेवलेले दिसते. त्यामुळे सायंकाळनंतर या ठिकाणी पूर्ण अंधार असतो. ही परिस्थिती केवळ अस्वच्छच नव्हे तर विशेषतः महिलांसाठी अत्यंत असुरक्षित आहे. तुटलेल्या वायरिंग, प्लास्टर उडालेले छत व दुर्गंधी यामुळे स्वच्छतागृहाचा वापर करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळच ठरत आहे.
त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो आहे की, स्वच्छतागृहांच्या दैनंदिन देखभाल-दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची कंत्राटे दिली जात असताना, पालिका प्रशासनाची नियंत्रक व नियामक यंत्रणा अस्तित्वात असताना, नागरिकांना प्रत्येक वेळी तक्रार का करावी लागते? कंत्राटदार काम करतात की फक्त कागदावर बिले सादर करतात? यापूर्वीही सजग नागरिक मंचाने सेक्टर-1 बेलापूर भाजी मंडई शेजारील स्वच्छतागृहाबाबत तक्रार केल्यानंतरच तेथे तातडीने वीज मीटर बसवण्यात आला व पाण्याचे कनेक्शन देण्यात आले होते. आता तिथे दिवसभर अनावश्यक पद्धतीने लाईट सुरू असल्याचे दिसते. यामुळे पालिका प्रशासनाला झाले आहे तरी काय? हा प्रश्न अनुत्तरीत राहत असल्याची भावना नागरिकांची झालेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन स्वच्छ सर्वेक्षणाच्या काळातच स्वच्छतेची दिखाऊ कामे करत असल्याचे वारंवार दिसून येते. दिल्लीहून सर्वेक्षण पथक येणार असेल तेव्हाच स्वच्छतागृहांची आठवण होणे ही ढोंगी स्वच्छतेची सवय आता उघड झाली आहे.
पारसिक हिलवर मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक विष्णू खंदारे यांनी मागणी केली आहे की, पालिकेने स्वच्छतागृहांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दिलेल्या सर्व कंत्राटांचा तपशील अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अकस्मित भेटी देऊन प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करावी.
तक्रारीनंतरच पालिका यंत्रणेला जाग
पारसिक हिलवरील त्रिस्तरीय वृक्षारोपण पाण्याअभावी अखेरच्या घटका मोजत असल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेने तातडीने टँकरने पाणी पुरवठा केला. त्याचे स्वागतच आहे. परंतु, स्वतःहून पालिका प्रशासनाला जाग का येत नाही? हा नागरिकांचा आर्त सवाल आहे. याचा अर्थ पालिकेची यंत्रणा तक्रारीनंतरच जागी होते, अन्यथा नागरिकांच्या हालअपेष्टांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते.
प्रशासक राजवट असताना आणि लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नसतानाही नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय दर्जाचे गंभीर अधःपतन झालेले दिसत आहे. आयुक्तांचा धाक ना अधिकाऱ्यांवर आहे, ना कंत्राटदारांवर. याची किंमत मात्र सामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे.
– ॲड. हिमांशू काटकर,
सजग नागरिक मंच, नवी मुंबई







