विविध पदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर
| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग येथील विख्यात व अत्यंत लोकप्रिय बालरोग तज्ञ डॉ. विनायक पाटील यांची महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यातील सुमारे 6,500 हून अधिक बालरोग तज्ञ डॉक्टरांची ही संघटना असून नुकत्याच पार पडलेल्या विविध पदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत डॉ. विनायक पाटील यांची 2027 साठी अध्यक्षपदी निवड झाली असून ते 2027 मध्ये औपचारिकरित्या राज्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यांच्या या निवडीमुळे रायगड जिल्ह्यासह कोकणातील वैद्यकीय क्षेत्रात आनंदाची व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
सामाजिक बांधिलकीला प्राधान्य डॉ. विनायक पाटील यांनी आपल्या निवडीनंतर बोलताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य बालरोग संघटनेच्या माध्यमातून खेडोपाडी, दुर्गम भागात तसेच आदिवासी वाड्यांमध्ये समाजोपयोगी व जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्याचा माझा मानस आहे. बालआरोग्य, लसीकरण, पोषण, माता-बाल संगोपन यावर विशेष भर दिला जाईल. त्यांनी या निमित्ताने रायगड जिल्हा व महाराष्ट्रातील सर्व बालरोग तज्ञांचे आभार मानले.
डॉक्टर नव्हे, कुटुंबातील सदस्य अशी ओळख
डॉ. विनायक पाटील यांची ओळख केवळ कुशल बालरोग तज्ञ म्हणून नव्हे, तर अत्यंत प्रेमळ, विश्वासू आणि माणुसकी जपणारे डॉक्टर म्हणून आहे. एखाद्या रुग्णाकडे उपचारासाठी आवश्यक फी नसेल, तर ते मोफत उपचार करून मदतीला धावून जातात. पैशासाठी कधीही तगादा न लावता, रुग्णाच्या आरोग्यालाच प्राधान्य देणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे. आपल्या व्यस्त दिनचर्येतूनही ते गरजू कुटुंबांसाठी, आपत्कालीन प्रसंगी व सामाजिक उपक्रमांसाठी सातत्याने पुढाकार घेतात. त्यामुळेच पालकांमध्ये आणि सहकारी डॉक्टरांमध्ये त्यांच्याबद्दल अपार विश्वास व आदर आहे.
वैद्यकीय क्षेत्रासाठी नवी दिशा
डॉ. विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य बालरोग संघटनेच्या कार्याला नवी दिशा व सामाजिक अधिष्ठान मिळेल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे. बालआरोग्य सुधारणा, ग्रामीण-आदिवासी भागातील आरोग्यसेवा बळकट करणे आणि नव्या पिढीतील डॉक्टरांना मार्गदर्शन देणे, हे त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत. डॉ. विनायक पाटील यांची ही निवड रायगड जिल्ह्यासाठी गौरवास्पद असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संघटनात्मक कामाच्या यशस्वीतेमुळे डॉ. विनायक पाटील यांच्यावर राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.







