रोहा तालुक्यात पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम; 21 कच्चे बंधारे लोकसहभागातून पूर्ण
| चणेरा | प्रतिनिधी |
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने सुरू झालेला पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम महाराष्ट्रभर लोकचळवळीचे स्वरूप घेत आहे. रोहा तालुक्यात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 21 कच्चे बंधारे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत.
रामानंद संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्माबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली जात असून, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हा संदेश केवळ उपदेशापुरता न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवला जात आहे. जलसंवर्धन ही केवळ शासकीय जबाबदारी नसून समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, ही जाणीव या उपक्रमातून प्रभावीपणे निर्माण होत आहे.
रोहा तालुक्यातील विविध गावांमध्ये एकूण 21 कच्चे बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. ही सर्व कामे भक्तगणांच्या स्वयंस्फूर्त श्रमदानातून, स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून करण्यात आली आहेत. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून, परिणामी विहिरी, बोअरवेल तसेच शेतीसाठी दीर्घकालीन लाभ होणार आहे.
सेवाकेंद्र न्हावे सोनखार 7, झोळांबे लक्ष्मीनगर 2, कोकबन 2, मुकटे 2, रोहा 1, विरझोली 1, बारशेत 1, नागोठणे 1, पाटणसई 1, खारगाव 1, खांदार 1 आणि वाली 1 या ठिकाणी कच्चे बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. या उपक्रमात युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सेवाभावी कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. कुणी श्रमदान केले, कुणी नियोजनात मदत केली, तर कुणी साहित्य व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. त्यामुळे हा उपक्रम केवळ जलसंधारणापुरता मर्यादित न राहता सामाजिक एकात्मतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे. तालुक्यातील सर्व सेवाकेंद्रांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत उल्लेखनीय योगदान दिले असून, तालुका सेवा समिती रोहा यांचा या उपक्रमात पूर्ण सहभाग लाभला आहे. या उपक्रमाबद्दल तालुका स्तरावरून सर्व सेवाकेंद्रांचे कौतुक व आभार व्यक्त करण्यात येत आहे.







