| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील काही विभागात फळ बागायतदार शेतकरी वर्गाला विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. विम्याच्या पैशांसाठी शेतकरी वर्गाची प्रतिक्षा काही संपत नसून बागायतदार शेतकरी वर्गाचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. दोन वर्षांपूर्वी अवकाळी पाऊस व बदललेले हवामानामुळे बागायतदार शेतकरी वर्गाचे खुप मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बागायती शेतीचे शासकीय पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई विम्याचे पैसे लवकरच मिळतील अशी आशा होती. परंतु, वर्ष उलटून गेले तरी अद्याप नुकसान भरपाई विम्याचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी वर्ग पुरता निराश झाला आहे. तालुक्यातील निडीतर्फे अष्टमी व आंबेवाडी-कोलाड हे दोन मंडळ वगळता बाकी जवळपास सर्वच मंडळातील शेतकरी वर्गाला विम्याचे पैसे मिळाले असल्याने निडीतर्फे अष्टमी व आंबेवाडी-कोलाड या दोन मंडळातीलच शेतकरी वर्गावर अन्याय का असा सवाल उपस्थित केला आहे. शेतकरी वर्गाला भरपाई मिळत नसल्याने त्यांची चिंता वाढू लागली आहे.







