| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम तसेच टीबी को-मॉर्बिडीटी समन्वय समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. अक्षयराज राठोड, डॉ. नालंदा पवनारकर, डॉ. प्रसाद वाईगणकर, डॉ. प्रदीप पोतदार, डॉ. विकास पवार, संजय माने, रेश्मा सकपाळ यांच्यासह विविध सामाजिक संस्था व कॉर्पोरेट क्षेत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत टीबी मुक्त ग्रामपंचायत उपक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. टीबी रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या चिप्स व कारटेजेसची कमतरता लक्षात घेता, त्यांची मुबलक उपलब्धता करून देण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्था व कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच अधिकाधिक संस्थांनी निक्षय मित्र म्हणून पुढे येऊन रुग्णांना पोषक आहाराचे फूड बास्केट उपलब्ध करून द्यावेत, ज्यामुळे रुग्ण लवकर बरे होऊन कुटुंब व समाजात टीबीचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असेही बैठकीत नमूद करण्यात आले. बैठकीची सविस्तर माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी दिली.







