| माणगाव | प्रतिनिधी |
औद्योगिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ग्रामीण भागातील मुलींच्या उज्जवल भविष्यासाठी एक आश्वासक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेला बळ देत कंपनीने भागाड ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक पात्र बालिकेच्या नावे 50 हजार रुपयांची मुदत ठेव करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. सन 2017 पासून सुरु असलेल्या या उपक्रमाद्वारे आत्तापर्यंत 100 मुलींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
या योजनेचे मुख्य वैशिट्य म्हणजे, ही 50 हजार रुपयांची ठेव मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत सुरक्षित राहते व 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणारी ती रक्कम मुलीला तिचे उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी उपयोगात येते. आर्थिक टंचाईळे ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण अपूर्ण राहू नये, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. दि.16 डिसेंबर रोजी भागाड ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात 2024 मध्ये जन्मलेल्या 5 मुलींना मान्यवरांच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पोस्कोचे वरिष्ठ अधिकारी, माणगावचे गटविकास अधिकारी, भागाड ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपरपंच, सदस्य, पदाधिकारी, मुलींचे पालक आदी उपस्थित होते.







