रायगडात नाताळ फिव्हर
| रायगड | प्रतिनिधी |
जोसेफ आणि मेरी यांचा मुलगा येशू यांना ख्रिश्चन धर्मात सर्वोच्च स्थान आहे. 25 डिसेंबर हा प्रभु येशू यांचा जन्मदिवस आहे. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस नाताळ सण म्हणून साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यातील चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाचा नाताळ सण मध्यरात्री अत्यंत भक्तिभावात, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. नाताळच्या पावन पर्वानिमित्त जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने चर्चमध्ये दाखल झाले होते.
रायगड जिल्ह्यात अनेक चर्च आहेत. यामध्ये ऐतिहासिक असणाऱ्या चर्चमध्ये माउंट कार्मेल चर्च कोर्लई, पोर्तुगीज चर्च रेवदंडा आणि सेंट अँथनी चर्च यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. चर्च ऑफ द नाझरेन क्रांती नगर, श्री स्वामी समर्थ नगर, सेंट अल्फोन्सा चर्च गणेश नगर, महाडिक वाडी, महाड, द पेंतेकोस्टल मिशन चर्च खोपोली, नेरळ येथे ‘अवर लेडी ऑफ फातिमा चर्च’ आणि ‘डोम बॉस्को युवा केंद्र’ सारखी ठिकाणे आहेत. तसेच अलिबाग, कर्जत, पनवेल, पेण, उरण आदी तालुक्यांमध्ये अनेक छोटी चर्च आणि प्रार्थना स्थळे आहेत.
ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये विशेष मिस्सा आयोजित केली जाते, ज्याला ख्रिसमस मिस्सा किंवा मध्यरात्रीची मिस्सा असे ही म्हणतात. मिस्सामध्ये प्रार्थना, बायबलचे वाचन, गायनचा समावेश होता. या मिस्सा व्यतिरिक्त अनेक कानांना गोड वाटणारी ख्रिसमसची गाणी म्हणजेच ख्रिसमस कॅरॉल्स गायली गेली. या गाण्यांमधून येशू ख्रिस्ताच्या जन्माची कथा आणि ख्रिसमसचा संदेश ऐकावयास मिळाला.
चर्चला रंगीबेरंगी विद्युत रोषणाई
नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर चर्च आणि संपूर्ण परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि नाताळविषयक प्रतीकांमुळे चर्च परिसर उजळून निघाला होता. ऐतिहासिक चर्चचे सौंदर्य रात्रीच्या रोषणाईत अधिकच खुलून दिसत होते. मध्यरात्री ठीक 12 वाजता येशू ख्रिस्ताच्या जन्माची विधिवत घोषणा करण्यात आली. त्यानंतर विशेष प्रार्थना, स्तुतिगीतं, धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडली.
सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी केली सामूहिक प्रार्थना
यावेळी उपस्थित भाविकांनी शांतता, ऐक्य, बंधुता आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना केली. नाताळचा संदेश मानवतेचा, प्रेमाचा आणि त्यागाचा असल्याचं धर्मगुरूंनी आपल्या संदेशातून उपस्थितांना सांगितलं. समाजात शांतता, सलोखा आणि परस्पर सन्मान टिकवून ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
ख्रिस्ताच्या जन्माचे सुंदर आणि मनमोहक देखावे
नाताळ सणाच्या आनंदात सहभागी होत ख्रिस्ती बांधवांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माचे सुंदर आणि मनमोहक देखावे साकारले होते. बाल येशू, माता मेरी, संत जोसेफ, गोठा, मेंढपाळ आणि देवदूतांचे प्रतीकात्मक दृश्य पाहण्यासाठी ग्रामस्थांसह पर्यटकांनीही मोठी गर्दी केली होती. लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात नाताळ सणाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. नाताळच्या निमित्ताने आनंद, उत्साह आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झालं असून, सर्व धर्मीय नागरिकांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपल्याचं सुंदर चित्र पाहायला मिळालं. नाताळ सणामुळं गावात सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून, हा सण शांतता आणि एकोप्याचा संदेश देणारा ठरल्याचं नागरिकांनी सांगितलं.







