चार पाच दिवस असणार वाहतूक कोंडी
| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (दि.25) सकाळी मोठ्या प्रमाणात पुण्यातील अमृतांजण ब्रिजपासून पाच ते सहा किमीपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. नाताळसह विकेंडच्या मुहूर्तावर पर्यटक बाहेर फिरायला येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
द्रुतगती महामार्गावरील पुणे लेनवर लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नाताळचा सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर पडल्याने या महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. लोणावळा परिसरात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ही कोंडी अधिक तीव्र असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कोंडीची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, प्रवाशांनी प्रवासापूर्वी वाहतूक स्थितीची माहिती घेऊनच बाहेर पडावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.






