| अलिबाग | प्रतिनिधी |
समाजात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे मुले आणि पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस दल आणि एम्पॉवर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात काका-दीदी पथक, दामिनी पथक आणि जिल्हाभरातील पोलीस कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांचे काका-दीदी आणि दामिनी पथक नियमितपणे शाळांना भेटी देऊन सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श, बालविवाह प्रतिबंध आणि पॉक्सो कायद्याबाबत जनजागृती करत असते. मात्र, अनेकदा पोलिसांच्या गणवेशामुळे किंवा जरबमुळे मुले आपली अडचण सांगायला घाबरतात. पोलीस हा समाजाचा मित्र आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. ही संकल्पना पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी मांडली होती. हीच दरी सांधण्यासाठी आणि पोलिसांना अधिक मुलांभीमुख बनवण्यासाठी एम्पॉवर फाउंडेशनला या प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. या शिबिरात एम्पॉवर फाऊंडेशनच्या तज्ज्ञांनी पोलिसांना मुलांशी संवाद साधण्याचे मनोवैज्ञानिक पैलू समजावून सांगितले. या प्रशिक्षणाचे यशस्वी नियोजन एम्पॉवर फाऊंडेशनच्या सीनिअर ऑपरेशन मॅनेजर दीप्ती हजारी, सेतू कार्यक्रम अधिकारी रुपेश पवार, अलिबाग तालुका क्लस्टर हेड अर्चना पाटील आणि क्लस्टर को-ऑर्डिनेटर पद्मा साठे यांनी केले. तसेच, मास्टर ट्रेनर अमोल काळे, अर्जुन माळगे आणि प्रगती कांबळे यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले.







