जिना सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी सरकता जिना उभारण्यात आला आहे. स्थानकातील मध्यवर्ती ठिकाणी हा सरकता जिना उभारण्यात आला असून अद्याप कार्यान्वित करण्यात आला नाही. सध्या या जिन्यावर प्लास्टिकचे आवरण टाकण्यात आले असून तो धूळखात पडला आहे. त्यामुळे नेरळ प्रवासी संघटनेने हा सरकता जिना सुरू करण्याची मागणी केली आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत दिशेकडे असलेल्या नेरळ जंक्शन स्थानकाचा कायापालट केला जात आहे. या स्थानकात प्रवासी वर्गाच्या सोयीसाठी नव्याने विकासकामे केली जात आहेत. ही विकासकामे करताना प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच, या नेरळ जंक्शन स्थानकातून माथेरानसाठी मिनीट्रेन सोडली जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. त्यात मुंबईकडून येणाऱ्या उपनगरीय लोकलमधून देखील प्रवासी नेरळ स्थानकात अधिक संख्येने येत असतात. ही बाब लक्षात घेऊन नेरळ स्थानकात फलाट क्रमांक एकवर एकाच वेळी तीन पादचारी पूल तसेच सरकता जिना कार्यान्वित केला आहे. मात्र, या स्थानकात उभारण्यात आलेला दुसरा सरकता जिना अद्याप कार्यान्वित झालेला नाही. हा सरकता जिना फलाटाच्या मध्यभागी असल्याने वृद्ध प्रवासी वर्गासाठी मदतगार ठरणार आहे. मात्र, नेरळ स्थानकातील प्रशासनाकडून हा सरकता जिना कार्यान्वित करण्यात आलेला नाही. सध्या त्यावर प्लास्टिकचे आवरण टाकले असून तो धूळ खात पडला आहे. त्यामुळे हा सरकता जिना उद्घाटना अभावी बंद आहे की, कामाच्या निकृष्ट दर्जेमुळे त्यात काही तांत्रीक अडचणी आहेत, असा प्रश्न सध्या प्रवासी वर्गातून उभा होत आहे. तसेच, याबाबत प्रवासी वर्गाकडून नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेकडे सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने तत्काळ हा सरकता जिना कार्यान्वित करावा, अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेकडून अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी नेरळ स्थानक प्रबंधक पाटील यांच्याकडे केली आहे.







