150 स्पर्धकांचा सहभाग
। नालासोपारा | विशेष प्रतिनिधी |
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील खुला रंगमंच येथे 15 वी राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर अर्चरी स्पर्धेला शनिवारी ( दि. 27) प्रारंभ झाला. पहिला दिवस सात वर्षाखालील मुलींपासून वरिष्ठ गट महिला आणि ज्येष्ठ महिला गटातील महिला नेमबाजांचा लागलेला कस पाहायला मिळाला. महिला धनुर्धारांनी आपल्या धनुर्विद्येच्या कलेने आलेल्या पाहुण्यांना आणि प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेतले.
राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर अर्चरी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर अर्चरी असोसिएशनचे सचिव तथा फिल्ड अर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाचे सुभाषचंद्र नायर, राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर अर्चरी असोसिएशनच्या उपाध्यक्ष रितिका नायर, फिल्ड इनडोअर अर्चरी असोसिएशन पालघरचे खजिनदार लायन हनुमंत भोसले, राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर अर्चरी असोसिएशनचे सहसचिव संतोष जाधव, फिल्ड इनडोअर अर्चरी असोसिएशन पालघरचे सचिव जयंत सातघरे, मिलिंद पांचाळ, अजिंक्य अडकर, वैभव सागवेकर, मयूर पांचाळ, विनायक नायर, लाभेश तेली, कार्तिकेय कांबळे, आरती कोकाटे, सागर हरिजन आदी उपस्थित होते.
शनिवारी घेण्यात आलेल्या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये महिला नेमबाजांचे सात गट खेळवण्यात आले. यामध्ये सात वर्षांखालील, दहा वर्षांखालील, 14 वर्षांखालील, 17 वर्षांखालील, 19 वर्षांखालील, वरिष्ठ गट, वरिष्ठ अनुभवी गटातील खेळाडूंचा समावेश होता. पहिल्या दिवशी महिला धनुर्धारांनी साजेसा खेळ करीत अलिबाग येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये आपली एन्ट्री फिक्स केली. या स्पर्धेमध्ये बांबूवूडन, फ्री स्टाईल रिकव्ह, फ्री स्टाईल अनलिमिटेड कंपाऊंड , बेअर बो बांबू वुडन, बेअर बो रिकव्ह, बेअर बो कंपाऊंड, नोविस बो, ट्रॅडिशनल बो हे धनुष्याचे प्रकार खेळणारे खेळाडू आले होते. प्रत्येक गटातील सुवर्णपदक आणि रौप्यपदक विजेत्या महिला खेळाडूंना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 17 धनुर्धरांची निवड
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील 17 धनुर्धारांची निवड करण्यात आली होती. चिंतामणराव केळकर विद्यालय अलिबाग येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये विजय संपादन केला होता. या खेळाडूंमध्ये महिला गटासाठी रुधिरा जाधव, क्षितिका महाले, स्वाहा कदम सिया कदम, ओवी पाटील, सई पिलणकर, वैष्णवी भोई, हरता गोरेगावकर तर पुरुष गटासाठी अवनिष गोगावले, अद्विक गोगावले, चैतन्य जाधव, आशय आंग्रे, अर्जुन म्हात्रे, आरव हूलवान, अथर्व पाटील, अंश पराडकर आणि लाभेश तेलीयांचा समावेश आहे.



