| अलिबाग | प्रतिनिधी |
गजानन हिराजी पाटील (जीएच पाटील) यांचे रविवारी (दि.28) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनासमयी ते 78 वर्षाचे होते. शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते, ताडवागळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शैलेश पाटील यांचे ते काका होतं.
गजानन पाटील अर्थात जीएच पाटील हे रायगड जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या विभागात कार्यरत होते. त्यांनी अलिबाग पंचायत समितीसह कृषी विभागात तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्विय सहाय्यक म्हणून सेवा केली. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तसेच रायगड जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी खंबीरपणे पार पाडली. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. काही वर्षापुर्वी ते सेवानिवृत्त झाले. सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. रविवारी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोलघर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, कुर्डूस विभागीय चिटणीस विलास म्हात्रे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमळाकर वाघमोडे तसेच रायगड जिल्हा परिषदेचे काही अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. दिवंगत गजानन पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नात असा परिवार आहे. गजानन पाटील यांचा दशक्रीया विधी मंगळवारी (दि.6) जानेवारी 2026 हरिहरेश्वर येथे होणार असून तेराव अर्थात उत्तरकार्य (दि.9) जानेवारीला राहत्या घरी होणार असल्याची माहिती पाटील कुटूंबियांकडून देण्यात आली.







