| पेण | प्रतिनिधी |
गेल्या दोन वर्षांपासून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक पेण येथील फार्म हाऊसला मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. या दरम्यान, पेण तालुक्यातील पुर्व भागातील व पाबळ खोऱ्यातील फार्म हाऊसवर अवैधरित्या दारू, गांजा, चरस अशा अंमली पदार्थांची रेलचेल वाढत असल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर खाकीची करडी नजर राहणार आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी आजकालची तरूणाई विविध ठिकाणी जात असते. परंतु, थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर महिनाभर आधीच मुंबई, ठाणे, नवीमुंबई, कर्जत, माथेरान, महाबळेश्वर व अलिबाग अशा ठिकाणचे फार्महाऊसेस फुल्ल झालेले असतात. तसेच, या दिवसांत येथील फार्महाऊसेस देखील मोठ्या प्रमाणात भाव खातात. त्यामुळे काहींच्या खिशाला ते परवडत नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पेण तालुक्यातील फार्म हाऊसवर तरूणाईची पावले वळत आहेत. परंतु, या कालावधीत त्यातील काही ठिकाणी अवैध धंदे आणि कारनामे होत असल्याचा संशय पेण पोलिसांना आहे. पेण तालुक्यातील काही ठिकाणी परवाना नसतानाही अनधिकृत ढाबे, चायनिज सेंटर, हॉटेल सुरू आहेत. आणि त्यातच खुलेआम मद्यविक्री केली जाते. तसेच, पेणमधील कोणत्याही फार्म हाऊसवर दारू विक्री अथवा पिण्यास सक्त मनाई असताना पुर्व विभागातील एक प्रसिद्ध वॉटरपार्कमध्ये सर्रास दारूची विक्री होत असल्याची माहिती देखील पोलिसांना आहे. त्यातच त्या वॉटर पार्कवर रात्रीच्या वेळी मुजऱ्याचे कार्यक्रम सुद्धा होत असल्याने कळत-नकळत चरस, गांजा सेवन करणारे देखील मोठ्या प्रमाणात या विभागात येत असतात. त्यामुळे याकडे उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. त्यासाठी पोलिसांनी विशेष दस्त तयार केला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अलर्ट मोडवर असल्याने थर्टी फस्टच्या नावाने होत असणारा नंगा नाच थांबणार, असे बोलले जात आहे.







