1 हजार 45 अर्जांची विक्री; एकूण 29 नामनिर्देश पत्र दाखल
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल पालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांकरिता 15 जानेवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे. या करता 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देश पत्र दाखल करता येणार असल्याने सोमवारी (दि.29) अनेक उमेदवारांनी नामनिर्देश पत्र दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. 29 डिसेंबरपर्यंत 1 हजार 45 अर्जांची विक्री झाली असून एकूण 29 उमेदवारांनी आपले नामनिर्देश पत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यात शेतकरी कामगार पक्षातर्फे अर्चना भोईर, योगिता फडके, अरविंद म्हात्रे आणि राम पाटील यांनी नामनिर्देश पत्र दाखल केले आहेत.
पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग समिती ‘अ’ उपविभाग नावडे या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 5, प्रभाग क्रमांक 3 मध्ये 4, तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये केवळ 1 च अर्ज दाखल करण्यात आला आहे. प्रभाग समिती ‘ब’ मध्ये मोडणाऱ्या प्रभाग क्रमांक 9 व 10 मध्ये प्रत्येकी 2 दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी सुरु असलेल्या प्रक्रियेदरम्यान 2 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. तर, प्रभाग क्रमांक 12 व 13 मधून प्रत्येकी 1 अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. प्रभाग समिती ‘ड’ पनवेल एक मधील प्रभाग क्रमांक 15 मधून 2, तर प्रभाग क्रमांक 16 मधून 5 अर्ज दाखल केले आहेत. तसेच, प्रभाग क्रमांक 19 मध्ये एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशा एकूण 29 उमेदवारांनी आपले नामनिर्देश पत्र दाखल केले आहेत.
दरम्यान, पालिका महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापकडून मोठे शक्तीप्रदर्शन करत माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांचे नामनिर्देश पत्र दाखल करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक 2 मधील सर्वच्या सर्व चार जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात आल्या आहेत. त्यात अर्चना भोईर, योगिता फडके, अरविंद म्हात्रे आणि राम पाटील यांनी सोमवारी आपले नामनिर्देश पत्र दाखल केले आहेत. ऐन निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपाचे कार्यकर्ते असलेल्या राम पाटील यांनी शेकापमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने प्रभाग क्रमांक 2 मधील मविआची ताकत वाढली असल्याचा प्रत्यय कळंबोली-रोडपाली येथील पनवेल पालिकेच्या सुवर्ण दुर्ग या कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीतून आला आहे. यावेळी, प्रभाग क्रमांक 2 मधील आघाडीच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी बोलून दाखवला आहे.







