| पनवेल | प्रतिनिधी |
नव वर्षाच्या स्वागता करिता अनेकजण रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी भेट देत आहेत. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्याला देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देत आहेत. यंदा 1 जानेवारी ते 28 डिसेंबर या कालावधीत एकूण 82,455 प्रौढ, 6,784 मुले आणि 174 विदेशी पौढ व 2 मुलांनी कर्नाळा अभयारण्याला भेटी दिल्या आहेत. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी जरी भेटी दिल्या असल्या तरी यंदा देखील बुधवारी (दि.31) कर्नाळा अभयारण्य बंद राहणार आहे.
नवी मुंबई व पनवेल जवळ असलेले प्रसिद्ध कर्नाळा पक्षी अभयारण्य सध्या निसर्गप्रेमी, पर्यटक आणि पक्षी निरीक्षकांचे आवडते ठिकाण ठरत आहे. येथील हिरवीगार वनसृष्टी, शांत वातावरण आणि विविध प्रकारच्यापक्ष्यांमुळे कर्नाळा अभयारण्य पर्यावरण पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. या अभयारण्यात 200 हून अधिक पक्षी प्रजाती आढळतात. त्यामध्ये स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश असून हिवाळ्यात येथे दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन घडते. हॉर्नबिल, मलबार व्हिसलिंग थ्रश, मॅजपाय रॉबिन यांसारखे पक्षी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, अभयारण्याच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक कर्नाळा किल्ला ट्रेकर्ससाठी आकर्षण ठरत असून युवकांसह कुटुंबीयही येथे मोठ्या संख्येने भेट देत आहेत. सकाळच्या वेळेत पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु, बुधवारी कर्नाळा अभयारण्य बंद असल्याचे अभयारण्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.






