| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-कुरूळ रस्ता नादूरुस्त आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांसह स्थानिकांना प्रचंड त्रास होत आहे. या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे कुरूळ ग्रामपंचायतीने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात दंड थोपटले आहे.
अलिबाग बायपास कॉर्नर ते कुरुळ या महत्त्वाच्या मार्गाच्या प्रश्नावर, प्रशासनाच्या अपयशावर नाराजी व्यक्त करत मंगळवारी (दि.23) ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला. रस्ते दुरुस्त करा, अन्यथा जनआंदोलन अटळ असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. हे रस्ते नाहीत, मृत्यूचे सापळे आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण ओळखले जाते. अलिबाग-रोहा या मार्गावरील कुरुळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून हजारोच्या संख्येने वाहनांची वर्दळ होते. अलिबाग रोहा, अलिबाग रेवदंडा, मुरूड, मुंबई, अशा अनेक निश्चित स्थळी जाण्या-येण्यासाठी कुरुळ हे महत्वाचे ठिकाण आहे. अलिबाग बायपास कॉर्नर ते कुरुळ या दरम्यानच्या रस्त्याची गेल्या सहा महिन्यांपासून अवस्था बिकट झाली आहे. या मार्गावर खोल खड्डे, उखडलेले डांबर, पावसात साचणारे पाणी यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, रुग्ण, महिला व ज्येष्ठ नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला.
दैनंदिन प्रवास करणाऱ्या कुरुळमधील व आसपासच्या गावांतील ग्रामस्थांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास, ग्रामस्थ उपोषण आणि रास्ता रोको आंदोलनाच्या भुमिकेत आहेत. पुढील आठवड्यात संपूर्ण ग्रामस्थ उपोषण व रास्ता रोको आंदोलन केला जाईल असा ठराव घेण्यात आला. आता शांत बसणार नाही! रस्ते दुरुस्त करा, अन्यथा जनआंदोलन अटळ आहे, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ॲड. प्रसाद पाटील यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक अलिबाग, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशा सर्व शासकीय खात्यांना ग्रामपंचायतीमार्फत कळविण्यात आले आहेत. 23 डिसेंबरला झालेल्या ग्रामसभेतील ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या संतप्त भावना व त्याबाबत झालेल्या ठरावाची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. या ठरावातून रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
सुकर व चांगल्या रस्त्यासाठी कुरुळ ग्रामस्थांनी एकमतांनी ठराव घेत प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहे. आंदोलनाची माहितीदेखील दिली आहे. प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.







