| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपुरकर इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत पुष्पगुच्छ स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा, सर्जनशीलतेचा उत्सव ठरली. इयत्ता पहिली ते पाचवीतील लहान विद्यार्थ्यांनी आपल्या नाजूक व कोमल हातांनी रंगीबेरंगी कागदांपासून विविध फुलांचे अप्रतिम आविष्कार साकारत संपूर्ण शाळा फुलांच्या दुनियेत न्हाऊन निघाली. देशविदेशातील विविध फुलांची रूपे, आकर्षक रंगसंगती, नक्षीकाम आणि कल्पक सजावटीतून विद्यार्थ्यांनी मनमोहक पुष्पगुच्छ तयार केले. फुले घडवताना ही चिमुकली मुले इतकी रमून गेली होती.
विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि कल्पनाशक्तीला योग्य दिशा मिळावी, यासाठी शिपुरकर शाळेत सातत्याने विविध कला व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पुष्पगुच्छ स्पर्धा ठेवण्यात आली. त्यात तब्बल 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शाळेतील वर्गखोल्यांमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या लहानग्या कलाकारांनी स्वतःच्या कल्पनांना वेगवेगळ्या आकारात साकारले. फुलांवरील कलाकुसर, नक्षीकाम आणि सुबक मांडणीने सजलेले पुष्पगुच्छ पाहताना प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध व्हावे असे दृश्य निर्माण झाले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आगामी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात गौरविण्यात येणार असून, त्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. मुख्याध्यापिका मनिषा मोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करत त्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत अशाच प्रकारे सर्जनशील उपक्रमात सक्रिय राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये तयार केलेल्या सर्व कलावस्तूंचे भव्य प्रदर्शन लवकरच भरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यापक व्यासपीठ मिळणार असून, पालक व नागरिकांना चिमुकल्या कलाकारांच्या प्रतिभेचे दर्शन घडणार आहे.







