शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न; व्यवस्थापन समितीचा आरोप
| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी येथील महिला उद्योग मंडळाने मुलांच्या शिक्षणासाठी सुरू ठेवलेली शाळा कोणत्याही दबावाला बळी न पडता सुरू ठेऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करू, असा निर्धार पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था व विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच, ही संस्था आणि शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असे वक्तव्य शाळा व्यवस्थापनाच्या अध्यक्षा सरोजिनी साजविन यांनी केले.
महिला उद्योग मंडळाची प्राथमिक शाळा पराडे-मोहपाडा येथे असून ती बेकायदेशीर असल्याचा आरोप सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहे. त्याबाबत बुधवारी (दि.31) पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व संस्थेची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पत्रकार परिषद देखील पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
मोहोपाडा रसायनी येथील महिला उद्योग मंडळ संचलित प्राथमिक शाळेवर रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाने कारवाई सुरू केली होती. ही शाळा 60 टक्के अनुदानित असून देखील विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर पद्धतीने मासिक फी घेत असल्याचे आरोप केले जात आहेत. तसेच, ही शाळा विनापरवानगी जिर्ण इमारतीत स्थलांतरीत करून पालक आणि शिक्षण विभागाची फसवणूक करत असल्याचे आरोप देखील करण्यात आले होते. त्यासंदर्भात बुधवारी पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व संस्थेची बैठक आयोजित केली होती. त्याचवेळी पत्रकार परिषद देखील पार पडली.
यावेळी बोलताना सरोजिनी साजवान म्हणाल्या की, 1965 साली हिंदुस्थान ऑरगॅनिक कंपनी सुरू झाली. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनातील महिला व पुरुष अधिकाऱ्यांच्या पत्नी एकत्र येऊन त्यांनी 1978-79 मध्ये महिला उद्योग मंडळ स्थापन केले. या महिलांनी 1985 च्या दरम्यान कंपनीच्या एका निवासी इमारतीत लहान मुलांसाठी शिशु वर्ग सुरू केला. शाळेसाठीची जागा एचओसी व्यवस्थापनाने दिली. परंतु, पराडे आदिवासी वाडीतील मुलांना शिक्षणाची काहीच व्यवस्था नव्हती. तेव्हा या वाडीला लागूनच कंपनीने दोन खोल्या बांधून या मुलांसाठी शाळा सुरू केली. परंतु, शाळेला मान्यता नसल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी दाखले देतांना अडचण निर्माण झाली. त्यामुळे 1997-98मध्ये महिला मंडळाचे रजिस्ट्रेशन घेऊन ही शाळा सुरू करण्यात आली. तत्कालीन कंपनी अधिकारी आणि मंडळाच्या अध्यक्षा रिना रामचंद्रांन यांनी या शाळेला मान्यता घेतली.
सन 2000 नंतर रिना रामचंदन यांनी कंपनी सोडल्याने कंपनीकडून शाळेला देण्यात येणारी मदत हळू हळू बंद झाली. आर्थिक अडचणींमुळे फी देऊन शिक्षण घेणाऱ्या मुलांना शाळेत प्रवेश द्यायला सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेल्यामुळे पराडे येथील दोन खोल्या कमी पडायला लागल्या. त्यामुळे कंपनीने त्यांच्या माणिक बिल्डिंगमध्ये शिशु वर्गासाठी ज्या खोल्या दिल्या होत्या तेथे शाळा सुरू केली. 2014-15 मध्ये आठवीच्या वर्गाला मान्यता मिळाली. दरम्यान, एचओसी कंपनीने आपली कंपनी विकून बीपीसीएल यांना विकली. येथील पुढारी अरुण गायकवाड यांनी शाळेची प्रगती करू, असे महिला मंडळ व्यवस्थापनाला सांगून पद ग्रहण केले आणि हळूहळू छोट्या छोट्या चुका काढून संस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी संस्थेतील वयोवृद्ध महिला पदाधिकाऱ्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली, असे साजवान यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, शाळेची इमारत नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे, अशा खोट्या अफवा पसरविण्यात येत आहेत. त्या दुसऱ्या कंपनीला विकायच्या असल्यामुळे शाळा इमारत अनाधिकृत ठरवून बंद पाडण्याचा डाव रचला जात आहे, असा आरोप महिला मंडळाच्या अध्यक्षा साजवान यांनी केला आहे.
खालापूर तालुक्यात सर्वाधिक पटसंख्या असणारी शाळा म्हणून ओळख असून गरजू गोरगरीबांना परवडणारी शाळा आहे. घरच्याप्रमाणे विद्यार्थ्यांची शाळेत काळजी घेतली जाते. आमची फसवणूक करुन शाळा बंद करण्याचे षडयंत्र आहे. याच शाळेतून शिक्षण घेऊन विद्यार्थी घडले आहेत. या शाळेच्या इमारतीची दरवषी देखभाल दुरुस्तीचे कामे केली जातात. स्वतःच्या भल्यासाठी शाळा बंद करण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरु आहेत.
-सरोजिनी साजवान,
अध्यक्ष, शालेय कमिटी







